Reliance Employee : मुकेश अंबानी यांच्यापेक्षा या कर्मचाऱ्याला जास्त पगार, कोण आहे ही व्यक्ती
Reliance Employee : या कर्मचाऱ्याला रिलायन्स समूहात सर्वाधिक पगार आहे. समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांना अधिक मेहनताना मिळतो. कोण आहे हा कर्मचारी ?
नवी दिल्ली | 22 जुलै 2023 : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट समूहाचे ते मालक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचा पसारा आज जगभर पसरला आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्सच्या (Bloomberg Billionaire List) टॉप-10 मध्ये पण ते होते. आताही ते टॉप-20 मध्ये आहेत. आता त्यांनी अनेक जुने ब्रँड्स विकत घेण्याचा धडाका लावला आहे. रिलायन्स रिटेलचा (Reliance Retail) पसारा त्यामुळे वाढला आहे. जिओ फायनान्स लिमिटेड ही कंपनी स्वतंत्र करुन ते वित्तीय क्षेत्रात धमाका करण्याच्या विचारात आहेत. पण मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांच्या एका कर्मचाऱ्यांचा पगार सर्वाधिक (Highest Salary) आहे. कोण आहे हा कर्मचारी?
रिलायन्सचे कर्मचारी किती?
रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील खासगी क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 2.30 लाख इतकी आहे. या कंपनीची स्थापना 1966 मध्ये धीरूभाई अंबानी यांनी केली होती. तेव्हापासून रिलायन्स इंडस्ट्री सातत्याने विस्तारत आहेत. कापड मिलपासून या कंपनीची सुरुवात झाली होती. त्यानंतर पेट्रो-केमिकल, रिटेल व टेलिकॉम क्षेत्रात या समूहाने प्रगती साधली. आता जिओ फायनान्स लिमिटेड ही कंपनी स्वतंत्र करुन ते वित्तीय क्षेत्रात नवीन रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहेत.
कोण आहेत निखील मेसवानी
रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये लाखो कर्मचारी आहेत. त्यात काही जण अंबानी कुटुंबाच्या अगदी जवळचे आहेत. ते विश्वासू सदस्य आहेत. अनेक दशकांपासून ते रिलायन्ससोबत जोडल्या गेले आहेत. निखील मेसवानी हे त्यापैकीच एक आहे. मेसवानी एक केमिकल इंजिनिअर आहेत. ते मुकेश अंबानी यांचे नातेवाईक आहेत. मेसवानी हे कार्यकारी संचालक आहेत.
1986 मध्ये नोकरीत रुजू
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्थापनेत रसिकलाल मेसवानी यांचा मोठा सहभाग होता. त्यांची दोन मुलं म्हणजे निखील आणि हितल मेसवानी हे आहेत. धीरुभाई अंबानी यांच्या मोठ्या बहिणीचे नाव त्रिलोचना आहे. रसिकलाल हे त्यांचे चिंरजीव. निखील मेसवानी हे प्रकल्प अधिकारी म्हणून 1986 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज रुजू झाले. दोनच वर्षात 1988 मध्ये पूर्णवेळ विशेष कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
अनके वर्षांपासून पगारात नाही वाढ DNA च्या रिपोर्टनुसार, निखील मेसवानी यांना 2021-22 मध्ये 24 कोटी रुपये पगार होता. तर मुकेश अंबानी यांचा पगार 2008-09 पासून 15 कोटी रुपयांवर स्थिर आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्षे मुकेश अंबानी यांनी पगार घेतला नाही. 2020-21 आणि 2021-22 याकाळत त्यांनी पगार उचलला नाही. निखील यांचा पगार 2010-11 मध्ये 11 कोटी रुपये होता. तेव्हापासून तो वाढतच गेला. त्यांचा पगार मुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त आहे.