Gold Investment : शेअर-म्युच्युअल फंड पडले थंडे, सोन्याने केले गुंतवणूकदारांना मालामाल, इतका दिला परतावा
Gold Investment : जागतिक बाजारात संकटांची मालिका सुरु असली की सोन्याच्या दरात जोरदार वाढ होते. गेल्या काही वर्षांत सोन्याने गुंतवणूकदारांना तगडा रिटर्न दिला आहे.
नवी दिल्ली : अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2023) शनिवार, 22 एप्रिल रोजी आहे. या दिवशी सोने खरेदी ही शुभ मानण्यात येते. त्यामुळे यादिवशी खरेदी केलेले सोने हे अक्षय असते, त्यामुळे घरात सुख आणि शांती येते, अशी मान्यता आहे. भारतीयांचं सुवर्णप्रेम सर्वांनाच माहिती आहे. चीन नंतर भारतात सोन्याची सर्वाधिक आयात करण्यात येते. सोन्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) फायदेशीर ठरली आहे. सोन्याने इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा सर्वाधिक परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार काही वर्षांतच मालामाल झाले आहेत.
इतर पर्याय फेल शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकेतील एफडी आणि इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा सोन्याने सर्वाधिक परतावा दिला आहे. तुमच्या पोर्टफोलिओतील सोन्याची गुंतवणूक फायदेशीर तर ठरेलच पण स्थिर उत्पन्नाचा हा स्त्रोतही ठरेल. यावेळी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढउतार सुरु आहे. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये विविधता असणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2023 मधील एका रिसर्चनुसार, अस्थिरत परिस्थितीत सोने गाठीशी असणे फायदेशीर ठरु शकते.
सोन्याची मोठी झेप जर गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली तर सोन्याची लांब उडी लक्षात येईल. सोने 31 हजार रुपयांहून 61 हजार रुपयांवर पोहचले आहे. सोन्याने गेल्या पाच वर्षांत दुप्पट कमाई करुन दिली आहे. आता 1 एप्रिलपासून हॉलमार्किंग सोने विक्री आणि खरेदी अनिवार्य करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सोन्यावर (Gold) 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्क कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे शुद्ध सोन्याची हमी ग्राहकांना मिळाली आहे.
गेल्या 100 दिवसांत सोन्याने दिला 9 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा
- 30 डिसेंबर 2022 रोजी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 55,017 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
- 10 एप्रिल 2023 रोजी म्हणजे 100 दिवसानंतर सोन्याचा भाव 5,021 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला
- याचा सरळ अर्थ ग्राहकांना 100 दिवसांत सोन्याने 5,021 रुपयांचा फायदा झाला
- सोन्याने या 100 दिवसांत गुंतवणूकदारांना 9.12 टक्के कमाई करुन दिली
- या 100 दिवसांत सोन्याच्या भावात प्रति तोळा 473 रुपयांची घसरण पण दिसून आली
11 वर्षांत भाव डबल
- गेल्या 11 वर्षांतील भावांवर नजर टाकल्यास किती फायदा झाला हे स्पष्ट होईल. सोन्याचा भाव डबल झाला आहे.
- 24 एप्रिल 2012 रोजी अक्षय तृत्तीयेला सोन्याचा भाव 29,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
- 13 मे 2013 रोजी अक्षय तृत्तीयेला एक तोळा सोन्याचा भाव 29,865 रुपये होता
- एका वर्षांत ग्राहकांना केवळ 2.88 टक्क्यांचा परतावा मिळाला
- चांदीने या काळात ग्राहकांना फटका दिला. चांदी जवळपास 19 टक्क्यांनी स्वस्त झाली
- चांदी 56,697 रुपयांहून 45,118 रुपये किलो झाली. 10,579 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त झाली
कोरोना काळात वाढला भाव
- 6 मे 2019 ते 24 एप्रिल 2020 या काळात सोन्याने 47.41 टक्के उसळी घेतली
- सोने 31,563 रुपये प्रति तोळ्याहून 46,527 रुपये प्रति तोळ्यावर पोहचले
- किंमतीत प्रति 10 ग्रॅम 14,964 रुपयांचा फायदा झाला
- 24 एप्रिल 2020 ते 14 मे 2021 या काळात चांदीत 69 टक्के वाढ झाली
- चांदी 42,051 रुपयांहून थेट 71,085 रुपये किलो झाली
- चांदीच्या किंमतीत एकाच वर्षात तब्बल 29,034 रुपयांचा फायदा झाला