Rupee Vs Dollar : कधी 4 रुपयांत मिळायचा 1 डॉलर, कधी झाली मोठी घसरण, डॉलरच्या तुलनेत असा झाला प्रवास
Rupee Vs Dollar : कधी काळी रुपया डॉलरला टशन देत होता, कधी झाली मोठी घसरण, कसा आहे इथपर्यंतचा प्रवास
नवी दिल्ली : अमेरिका जागतिक महासत्ता आहे. सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने डॉलरचा (American Dollar) जगात बोलबाला आहे. डॉलरचा टणात्कार सर्वच चलनावर भारी आहे. डॉलर जगातील सर्वात तगडे चलन आहे. जगातील जवळपास अनेक अर्थव्यवस्था डॉलरमध्येच व्यवहार करतात. गुंतवणूकदारही डॉलरमध्येच इतर देशात व्यवहार, व्यापार अथवा गुंतवणूक करतात. डॉलरला जागतिक करन्सी मानण्यात येते. डॉलर जगातील इतर देशांच्या चलनाचे मूल्यही ठरवते. भारतीय रुपयाची (Indian Rupees) ताकद ही डॉलरच्या तुलनेत जोखता येते. आता भारतीय रुपयात व्यापार आणि व्यवहार करण्यास भारत सरकारने (Central Government) चालना दिली आहे. विशेष म्हणजे काही देशांनी भारतीय रुपयाला मान्यताही दिली आहे.
आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत असला तरी सर्वच वेळ परिस्थिती नव्हती. एकेकाळी चार रुपयांत एक डॉलर खरेदी करता येत होता. अर्थात ही गोष्ट 1947 मधील आहे. त्यावेळी एक डॉलरचे मूल्य 4.16 रुपये होते.
1950 पासून ते 1966 पर्यंत एक डॉलर, 4.76 रुपयांत खरेदी करता येत होता. त्यानंतर भारतावर संकटांची मालिका सुरु झाली. 1962 मध्ये भारत-चीन युद्ध, 1965 मध्ये पाकिस्तानसोबतचे युद्ध, 1966 मधील दुष्काळ ही संकटे आली. त्यामुळे रुपयाचे मूल्य अजून घसरले.
1967 मध्ये एक डॉलरचे मूल्य 7.50 रुपये झाले. त्याच काळात कच्चा तेलाचा पुरवठा कमी झाल्याने आणखी एक संकट चालून आले. 1974 मध्ये एका डॉलरसाठी 8.10 रुपये मोजावे लागले. त्यानंतर देशात राजकीय संकट आले. देश कर्जबाजारी झाला. मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याने भारतीय रुपयाची घसरण झाली.
पुढील दोन दशकात परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. भारतीय अर्थव्यवस्था मोठी होत असली तरी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया अजून घसरला. 1990 मध्ये भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 17.50 झाला.
1990 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था संकटातून बाहेर आलीच नाही. भारतावर परदेशी कर्जाचा डोंगर वाढत गेला. जेवढे उत्पन्न होत होते, त्यातील 39 टक्के रक्कम कर्जाचे व्याज फेडण्यात जात होते. केंद्र सरकारची वित्तीय तूट 7.8 टक्क्यांवर पोहचला. भारत दिवाळखोरीच्या वाटेवर पोहचला.
पण तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी आर्थिक सुधारणांना प्राधान्य दिले. त्यामुळे अर्थव्यवस्था मोठ्या संकटातून बाहेर आली. 1992 मध्ये एका डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य घसरले आणि हे चलन 25.92 रुपयावर पोहचले.
2004 मध्ये युपीआयच्या काळात डॉलर आणखी मजबूत झाला. एका डॉलरसाठी 45.32 रुपये मोजावे लागले. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यावर घसरणीचा वेग आणखी वाढला. एकाच वर्षात एका डॉलरसाठी 63 रुपये मोजावे लागले. त्यानंतर 2021 मध्ये एक डॉलरचे मूल्य 74.57 रुपया इतके झाले.
2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई, अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्याचा परिमाम दिसून आला. भारतीय रुपयाचे मूल्य घसरुन 83 रुपये झाले. सध्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 81.71 च्या जवळपास आहे.