Toyota : टाटा यांची सून सांभाळणार Toyota चा कारभार! असे आहे महाराष्ट्राशी कनेक्शन
Toyota : टाटांची सून टोयोटाचा कारभार सांभाळणार आहे. तिचे महाराष्ट्राशी असलेले नाते माहिती आहे का?
नवी दिल्ली : देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटारचा (TKM) कारभार टाटांच्या सूनेच्या हाती देण्यात आला आहे. टोयोटोचे स्टेअरिंग आता मानसी किर्लोस्कर-टाटा (Manasi Kirloskar Tata) यांच्या हाती असणार आहे. तात्काळ प्रभावाने त्यांची TKM च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिवंगत विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar) यांची मानसी ही कन्या आहे. विक्रम किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर समूहाचा कारभार वाढवला. पुणे येथून सुरु झालेला हा व्यवसाय आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. विक्रम किर्लोस्कर यांचे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निधन झाले होते.
टीकेएमने गुरुवारी याविषयीचे अधिकृत वक्तव्य केले. मानसी या टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्ट्सच्या पण उपाध्यक्ष पदी असतील. विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. आता मानसी टाटा या समूहाची जबाबदारी संभाळतील.
नेविल टाटा हे मानसी टाटा यांचे पती आहे. नेविल हे रतन टाटा यांचे चुलत भाऊ नोएल टाटा यांचे बंधु आहेत. मानसी आणि नेविल यांचे लग्न 2019 मध्ये झाले होते. 32 वर्षांच्या मानसी किर्लोस्कर या वडिलांची कंपनी किर्लोस्कर सिस्टम लिमिटेडच्या (Kirloskar Systems Ltd) संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
मानसी किर्लोस्कर यांनी वडिलांच्या कंपनीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मानसी किर्लोस्कर यांची त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच उत्तुंग भरारी घेतली. 2018 साली संयुक्त राष्ट्रांच्यावतीने त्यांची बिझनेस लिडर म्हणून निवड झाली. त्यांनी अमेरिकेतील रोड आयलंड स्कूल ऑफ डिझाईनमधून पदवी घेतली आहे.
मानसी यापूर्वीच टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेडची संचालक मंडळाच्या सदस्य आहेत. टीकेएमच्या अनेक महत्वपूर्ण निर्णय आणि धोरणांसंबधींचा ही त्या भाग आहेत. टीकेएमचे व्यवस्थापकीय संचलाक आणि सीईओ मसाकाजू योशिमुरा यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत, त्यांना या व्यवसायाची जाण असल्याचे म्हटले आहे.
किर्लोस्कर समूहात सध्या 8 कंपन्या आहेत. या कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. या कंपन्यांमध्ये किर्लोस्कर ब्रदर्स (KBL),किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड (KIL),किर्लोस्कर फेरम इंडस्ट्रीज लिमिटेड( KFIL), किर्लोस्कर ऑयल इंजिन लिमिटेड (KOIL), किर्लोस्कर न्यूमेटिक कंपनी लिमिटेड ( KPCL), किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेड ( KECL), एनवायर इलेक्ट्रोडाइन लिमिटेड आणि जी जी दांडेकर मशिन वर्क्स लिमिटेड यांचा समावेश आहे.