New Labour Code | 3 दिवस सुट्टी आणि कमी वेतन कायद्याचा फायदा कोणाला? काय आहे यामागे सरकारचा प्लॅन?
New Labour Code | 3 दिवस सुट्टी आणि कमी वेतन कायद्याचा फायदा कोणाला होणार याविषयी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
New Labour Code | केंद्र सरकार लवकरच कामगार कायदे (New Labour Law) लागू करण्याच्या तयारीत आहे. हे कायदे कधी अंमलात येतील याविषयी सरकारने अद्यापही अधिकृतरित्या काहीच जाहीर केले नाही. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांनी नवीन कामगार कायदे आणण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार हे कायदे आणण्यासाठी का आग्रही आहे, याची मीमांसा त्यांनी पुणे येथे आयोजीत एका कार्यक्रमात केली आहे. नवीन वेतन संहितेविषयी (New Wages Code) उद्योग जगताने अनुकूल प्रतिक्रिया दिली आहे. आज याविषयीची एक बैठक ही आयोजीत करण्यात आली होती. आता राज्य सरकारशी विचार विनमयानंतर केंद्र सरकार (Central Government) हे कायदे कधी लागू करण्यात येतील याचा निर्णय घेणार आहे. येत्या चार दिवसांत याविषयीचा निर्णय येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.
कायद्यामागील सरकारचे धोरण
पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट यांनी एक कार्यक्रम आयोजीत केला होता. त्यात मंत्री भूपेंद्र यादव यांनी कायद्या मागील सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी हे कायदे फक्त कामगारांच्या सुरक्षेसाठीच नाही तर नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ही उपयुक्त असल्याचा दावा केला. चार दिवसांचे काम आणि पीएफ मधील जास्त योगदान यामुळे कामगारांचा फायदा होईल. तसेच इतरांनाही रोजगाराच्या संधी मिळतील. कौशल्य आणि विकास कार्यक्रमांवर कंपन्या लक्ष देतील तसेच उत्पादनही यामुळे वाढले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महिला आणि पुरुष असा भेदभाव समाप्त करुन कामाच्या ठिकाणी दोघांना ही योग्य मेहनताना मिळण्यासाठी हा कायदा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. 29 विविध अधिनियमांना एकत्र करुन चार नवीन लेबर कोड तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पीएफमधील योगदानात वाढ
नव्या लेबरकोडनुसार कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे एकूण पगाराच्या किमान पन्नास टक्के असणे आवश्यक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होणारी रक्कम वाढेल तर हातात येणारा पगार कमी होईल. मात्र या सर्व गोष्टींचे फायदे संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर मिळतील. निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांमध्ये वाढ होईल. सुट्यांच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, सुट्यांचे नियम हे पूर्वीच्याच लेबर कोडप्रमाणे असणार आहेत. कामाच्या तासांतील बदलामुळे आठवड्याला एक सुटीऐवजी तीन साप्ताहिक सुट्या मिळणार आहेत.
कामाचे तास वाढणार
नवे लेबर कोड लागू होताच कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे. नवीन नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना बारा तास काम करावे लागण्याची शक्यता आहे. परंतु आठवड्यात 4 दिवस काम करावे लागणार आहे तर 3 दिवस सुटी असणार आहे. चार दिवस बारा तास काम म्हणजे आठवडाभरात एकूण 48 तास काम करावे लागणार आहे. कंपनीला कर्मचाऱ्यांकडून यापेक्षा अधिक काम करून घेता येणार नाही. कामासोबतच ओव्हर टाईमची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.