World Cup 2023 | दिवाळे निघू नये यासाठी 1800 कोटींचा विमा, विश्वचषकासाठी अशी ही तयारी
World Cup 2023 | आयसीसी विश्वचषक 2023 पूर्वी पावसाने अनेक सामन्यांवर पाणी फेरले होते. त्यामुळे प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा हिरमोड झाला होता. तर सामना न रंगल्याने टीव्ही चॅनल, सामना प्रेक्षपण करणाऱ्यांचे आर्थिक नुकसान ओढवले होते. त्यामुळेच या विश्वचषकापूर्वी विमा घेऊन नुकसान टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नवी दिल्ली | 19 नोव्हेंबर 2023 : ICC World Cup 2023 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारतात सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली. भारतीय संघ फलंदाजीला मैदानात उतरला आहे. त्यात भारताने शुभमनच्या रुपाने पहिला फलंदाज गमावला आहे. केवळ अंतिम सामनाच नाही तर या विश्वचषकात एक खास गोष्ट घडली आहे. या विश्वचषकासाठी भारताच्या सामन्यासाठी 80 कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. आकड्यांनुसार, केवळ ब्रॉडकास्टर स्टार इंडियाने 48 सामन्यांसाठी एकूण 1800 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. यामध्ये इतर ब्रॉडकास्टर, प्लॅटफॉर्म यांनी घेतलेल्या विम्याचा समावेश नाही. विमा कंपन्यांसाठी ही कमाई ठरली. कारण या विश्वचषकातील कोणत्या ही सामन्यात निसर्गाचा अथवा इतर कोणताच मोठा अडथळा आला नाही. वायु प्रदूषणाचा मुद्दा तेवढा गाजला.
यापूर्वी विम्यासाठी दावे
एका विमा ब्रोकरने माहिती दिली. त्यानुसार, या विश्वचषकापूर्वी आशिया कपमध्ये हवामानाचा फटका बसला. पावसाने व्यत्यय आणल्याने सामना रद्द झाला अथवा अचानक सामना थांबवावा लागला. त्यामुळे विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईसाठी दावे दाखल करण्यात आले. या विश्वचषकात किरकोळ अडथळे आले. त्यामुळे विमा कंपन्यांचे फावले. त्यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्यात आला नाही.
अशी झाली कमाई
टाईम्स ऑफ इंडियाने विमा क्षेत्रातील सूत्रांच्या आधारे एका अहवाल दिला. त्यानुसार, विश्वचषकासाठी अनेक ब्रॉडकॉस्ट कंपन्यांनी विम्याच्या हप्त्यापोटी 64 कोटी रुपये मोजले आहेत. या कंपन्यांनी खासकरुन भारताच्या सामन्यासाठी अधिक हप्ता मोजला. भारताच्या जवळपास सर्वच सामन्यासाठी विमा उतरविण्यात आला होता. विमा कव्हरेज 80 कोटी रुपयांपर्यंत पोहचले होते.
2011 च्या तुलनेत विमा वाढला
एका ब्रोकरनुसार, यापूर्वी आयोजीत विश्वचषकापेक्षा यंदा विम्याचे संरक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. टूर्नामेंट प्रसारक, प्रायोजक, स्टेडियम राईट्स आणि संघाशी संबंधित सर्व सदस्यांचा यावेळी विमा उतरविण्यास प्राधान्य देण्यात आले. या विश्वचषकाच्या आयोजनात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी आघाडीवर आहे. तर इतर अनेक खासगी विमा कंपन्यांनी पण पुढाकार घेतला आहे. यावेळी कोणतेच विघ्न न आल्याने या विम्या कंपन्या फायद्यात राहिल्या. त्यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी दावाच आला नाही. त्यांची जोरदार कमाई झाली.