Bumper Recruitment : अजिबात घाबरु नका! भारतात बंपर नोकऱ्या
Bumper Recruitment : जगातील अनेक महासत्तांमध्ये नोकर कपातीचा धडाका लागला असला तरी भारतीय तरुणांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. या रिपोर्टने धाडलाय सांगावा..
नवी दिल्ली : जगभरात मंदीचे वारे आहे. नवनवीन तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळे, महागाईमुळे अनेक कंपन्यांनी कामगार कपातीचा बडगा उगारला आहे. गुगल, फेसबुक, ॲमेझॉनसह अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांनी नोकर कपातीचा अजेंडा राबविला आहे. त्यामुळे जगभरात अनेक तरुण बेरोजगार (Unemployment) झाले आहेत. पण भारतात मात्र त्यापेक्षा वेगळे वातावरण आहे. येथील तरुणांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. भारताचा आर्थिक विकास गतिमान आहे. भारतात अजूनही कर्मचारी कपातीचे (Retrenchment) मोठे धोरण नसून बंपर भरतीचे वातावरण आहे. भारतीय तरुणांनी चिंता करायची गरज नसल्याचा सांगावा या जागतिक अहवालात समोर आला आहे.
काय म्हणतो अहवाल मॅन पॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलूक सर्वेनुसार, भारतात जुलै-सप्टेंबरच्या कालावधीत 36 टक्के कर्मचारी भरती होण्याची शक्यता आहे. या बंपर नोकर भरतीमुळे भारत जगातील पाच देशांच्या यादीत जाऊन बसला आहे, ज्यामध्ये कर्मचारी भरती आणि नोकऱ्यांची मोठी शक्यता आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया हा चौथ्या स्थानावर आहे. तर भारत पाचव्या स्थानावर आहेत.
अमेरिकेत रोजगाराची मोठी संधी सर्वच क्षेत्रात अमेरिकेत सध्या नोकरीची मोठी संधी आहे. उत्तर अमेरिकेत 35 टक्क्यांहून अधिक रोजगार उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर आशिया प्रशांत भागात 31 टक्क्यांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील. तर दक्षिण अमेरिकेत नोकरीचे प्रमाण 29 टक्क्यांहून अधिक आहे. इतर भागात 20 टक्क्यांहून अधिक नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.
तीन महिने महत्वाचे मॅनपॉवर ग्रुपचे चेअरमन आणि सीईओ जोनास प्रिसिंग यांचा दावा सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या मते, येत्या तीन महिन्यात जगभरातील काही भागात कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती करतील. सध्या नोकऱ्यामध्ये जे कपातीचे धोरण आहे, ते निवळेल आणि ग्राहकांचा विश्वास वाढताच रोजगार वृद्धी होईल. रिटेलसह अनेक उद्योगांमध्ये कर्मचारी कमी असल्याने त्यांच्यासमोर आव्हाने तयार होत आहे.
वाईट काळ लगेचच संपेल अमेरिकेसह अनेक देशात तिसऱ्या तिमाहीत रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. जागतिक कर्मचारी कपात आणि जागतिक आर्थिक घडामोडींमुळे नोकर कपात होत आहे. पण हे मळभ लवकरच दूर होईल. आशिया प्रशांत भागात 31 टक्क्यांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील. तर दक्षिण अमेरिकेत नोकरीचे प्रमाण 29 टक्क्यांहून अधिक असेल. कोरोना, जागतिक घडामोडी याचा परिणाम झाला आहे. वार्षिक आधारावर नोकरी उपलब्ध होण्याचे प्रमाण घसरले आहे. पण हे संकट लवकरच दूर होईल असा दावा करण्यात आला आहे.
या क्षेत्रात नोकऱ्यांचा पाऊस आयटी उद्योग, डिजिटल क्षेत्र मजबूत स्थितीत राहिल. आयटी क्षेत्रात 39 टक्के नोकऱ्या उपलब्ध होतील. सर्वाधिक नोकऱ्या याच सेक्टरमध्ये असतील, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. त्यानंतर ऊर्जा आणि सेवा क्षेत्राचा क्रमांक लागतो. या क्षेत्रात 34 टक्के रोजगार संधी उपलब्ध होतील. या सर्वेसाठी 39,000 कंपन्यांची निवड करण्यात आली होती. या अहवालातील दाव्यानुसार, 41मधील 29 देशांमध्ये येत्या तिमाहीत रोजगार वृद्धीचे आश्वासन पहायला मिळाले आहे.