Mega Bharti 2023 : जिल्हा परिषदेतील 19,460 जागांच्या मेगा भरतीला सुरुवात, असा करा अर्ज
Zila Parishad Mega Bharti 2023: राज्यातील जिल्हा परिषदेतील मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. 19,460 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेची भरतीसाठी अर्ज भरणे सुरु झाले आहे.
पुणे | 5 ऑगस्ट 2023 : राज्यातील ३४ जिल्हा परिषदेमध्ये मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. १९ हजार ४६० जागांची ही भरती होणार आहे. त्यासाठी शनिवारी जाहिरात काढण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी एक हजार जागा सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गात सरळसेवा भरती होणार आहे. त्यासाठी २५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारीच यासंदर्भात माहिती दिली होती.
पुणे जिल्हा परिषदेत किती आहेत जागा
पुणे जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. पुणे जिल्हा परिषदेत तब्बल १ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुण्यातील ही भरती प्रक्रिया गेल्या चार वर्षांपासून चर्चेत आहे. २०१९मध्ये जि.प.साठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र तिला स्थगित आली. त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरु होत आहे.
कसा करावा अर्ज
- जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
- अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
- ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
कोण राबवणार प्रक्रिया
जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.
प्रक्रिया असणार पारदर्शक
जिल्हा परिषद भरतीसाठी दलाल बाहेर फिरत आहेत. त्या आमिषाला बळी पडू नका. ही प्रक्रिया पारदर्शक होणार आहे. पैसे देऊन मार्क वाढणार नाहीत, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. गेल्या काळात काही परीक्षा झाल्या. तेव्हा पेपर फुटले, डमी विद्यार्थी बसले, उत्तर पत्रिकेत घोटाळा झाला, टीईटीमध्येही घोटाळा झाला, आता असे होणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.