पतंग काढताना वीजेचा शॉक लागला, 12 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूने शहर हळहळले
प्रणव नेहमीप्रमाणे दुपारी शाळेतून घरी आला. त्यानंतर तो पतंग उडवायला गेला. खेळता खेळता प्रणवची पतंग तुटली आणि वीजेच्या तारांवर जाऊन अडकली.
बुलढाणा : पतंग काढताना वीजेचा शॉक लागून 12 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा शहरातील वावरे ले आऊटमध्ये घडली आहे. प्रणव विनोद बोरकर असे मृतक मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. प्रणवच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महात्मा फुले प्राथमिक शाळेस सातव्या इयत्तेत प्रणव शिकत होता. या घटनेमुळे प्रणवच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शाळेतून आल्यानंतर पतंग उडवायला गेला
प्रणव नेहमीप्रमाणे दुपारी शाळेतून घरी आला. त्यानंतर तो पतंग उडवायला गेला. खेळता खेळता प्रणवची पतंग तुटली आणि वीजेच्या तारांवर जाऊन अडकली. ही पतंग काढण्यासाठी प्रणव दुसऱ्या गल्लीत बांधकाम सुरु असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला.
लोखंडी गजाने पतंग काढताना शॉक लागला
लोखंडी गजाच्या सहाय्याने प्रणव पतंग काढत होता. यावेळी त्याला शॉक लागला आणि तो खाली जमिनीवर कोसळला. आजूबाजूच्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
प्रणवला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत प्रणवला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लोखंडी सळीचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शॉक लागून तो खाली कोसळला.
आई-वडिल दोघेही कामावर गेल्याने घरी एकटाच होता
प्रणवचे वडिल खाजगी चालक म्हणून काम करतात, तर आई नर्स आहे. आई-वडिल दोघेही कामाला गेले होते. त्यामुळे प्रणव घरी एकटाच होता. दुपारी शाळेतून आल्यानंतर तो खेळायला गेला अन् दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.