पोषण आहाराचा 281 पोते तांदूळ नाशिकमध्ये जप्त; टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रताप महिला बचत गटामुळे उघड
नाशिकमधील 13 कंत्राटदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई मागे घेण्यासाठी काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी जोर लावला होता. सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेतली. आमदारांच्या या भूमिकेमुळे महिला बचत गटांमध्ये तीव्र असंतोष आहे.
नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) पोषण आहारातील लोणी खाण्याचा प्रताप एका महिला बचत गटाच्या खमकेपणामुळे उघड झाला आहे. एका कंत्राटदाराने चक्क 281 पोते तांदूळ म्हणजे तब्बल 15 हजार किलोच्या या धान्यावर डल्ला मारला होता. त्यातही विशेष म्हणजे या कंत्राटदाराचे 2 कोटी 70 लाखांचे बिल काढण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण (Education) संचालयाचे पथक तपासणीसाठी आले होते. त्यांच्यापुढेच कंत्राटदारा पोषण आहाराच्या तांदळावर कसा डल्ला मारतोय, ही पोती गोदामात कशी पडून आहेत, हे महिला बचत गटाने दाखवून दिले. मात्र, या पथकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी येथे छापा मारला. महिला बचत गटाच्या या धाडसाचे कौतुक होत आहे. नाशिक जिल्ह्यात इतर ठिकाणी असा प्रकार सुरू आहे का, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान आता शिक्षण विभागापुढे आहे.
नेमके प्रकरण काय?
तांदूळ घोटाळ्याच्या साठा उत्तराची कहाणी अडीच वर्षांपूर्वी सुरू होते. शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना बाजूला सारून 13 कंत्राटदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम दिले. तेच काम पंचवटीतील गुंजाळबाबा नगर येथे निफाड येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या कंत्राटदाराकडे देण्यात आले. कंत्राटदार हृषीकेस चौधरी याने याचाच लाभ घेत तब्बल 281 पोते तांदूळ म्हणजे 15 हजार किलोच्या धान्यावर डल्ला मारला. याची माहिती महिला बचत गटाला समजली. त्यांनी तपासणीसाठी आलेल्या प्राथमिक शिक्षण संचालयाच्या पथकाला माहिती देऊनही त्यावर कारवाई झाली नाही. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी या ठिकाणी धडक दिली. पंचनामा केला. त्याचा अहवाल आज त्या आयुक्तांना देणार आहेत.
आमदारांचे आशीर्वाद
नाशिकमधील या 13 कंत्राटदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई मागे घेण्यासाठी काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी जोर लावला होता. सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेतली. आमदारांच्या या भूमिकेमुळे महिला बचत गटांमध्ये तीव्र असंतोष आहे. आता मात्र, कंत्राटदार हा तांदूळ निकृष्ट होता म्हणतोय, तर आमदार कंत्राटदार दोषी असल्यास कारवाई करा म्हणून हात झटकतायत.
इतर बातम्याः
Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!
महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!
नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?