बनावट सोने तारण ठेवत बँकेची लाखोंची फसवणूक, ‘असा’ उघड झाला बनाव
एका कंपनीचे संचालक असल्याचे भासवत आरोपींनी बनावट सोने तारण ठेवत बँकेला लाखोला गंडा घातला. पण त्यांचा हा बनाव अखेर उघडकीस आला.
चंद्रपूर : बनावट सोने तारण ठेवत बँकेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. वरोरा येथे खाजगी बँकेची 54 लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे. एसाफ स्मॉल फायनान्स बँकेला तीन आरोपींनी 10 वेगवेगळ्या कर्ज प्रकरणात बनावट सोने तारण ठेवत गंडवले आहे. तीन आरोपींनी स्वतः कंपनी संचालक असल्याचे भासवून बँकेकडे गहाण ठेवले होते. मात्र सोने कर्ज मंजूर झाल्यानंतर ऑडिटमध्ये सोने बनावट असल्याचे सिद्ध झाले. यानंतर बँक व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ज्ञानेश्वर झिले, संदीप गंधारे, नरेश दूधगवळी अशी तिघा आरोपींची नावे आहेत. वरोरा पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
वरोरा येथील इसाफ स्मॉल फायनान्स बँकेमध्ये दहा वेगवेगळ्या कर्ज प्रकरणात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यात आले होते. एकून 54 लाख 49 हजाराचे कर्ज उचलण्यात आले होते. याप्रकरणी बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या सोने तारण कर्ज योजनेत 54 लाखांची फसवणूक
नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील विनायक लेआउट परिसरात असलेल्या इसाफ स्मॉल फायनान्स बँकेमध्ये वरोरा येथील भूषण ज्ञानेश्वर झिले, संदीप गंधारे आणि येन्सा येथील नरेश दुधगवळी यांनी सोने तारण ठेवले. आरोपींनी 9 मार्च 2023 ते 8 मे 2023 दरम्यान 10 वेगवेगळ्या सोने तारण कर्ज योजनेत सोन्याचे दागिने तारण ठेवून 54 लाख 49 हजार रुपयांचे कर्ज उचलले. परंतु जेव्हा सदर बँकेचे ऑडिट अधिकाऱ्यांनी केले, तेव्हा सदर सर्व दागिने सोन्याचा मुलामा चढवलेले बनावट दागिने असल्याचे आढळून आले. त्यामुळे 18 मे 2023 रोजी बँकेच्या व्यवस्थापकांनी वरोरा पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी चौकशी करून 20 मे रोजी तीन आरोपीविरुद्ध 417, 420, 467, 468, 120(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु तिन्ही आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सदर प्रकरणाचा तपास वरोरा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे करीत आहे.