Mumbai Crime : कुंपणानेच शेत खाल्लं, कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच कट रचत लुटले मालकाचे 75 लाख, अखेर…
लुटलेल्या रकमेपैकी 15 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून त्यासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी आणि एक शस्त्रही जप्त केले आहे असे पोलिसांनी सांगितले.
मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : मालाडमध्ये गेल्या आठवड्यात चाकूचा धाक दाखवून 75 लाख रुपये लुटून पळून गेलेल्या 7 आरोपींना (7 arrested) अखेर अटक करण्यात आली आहे. मालाडच्या मार्वे रोडवरील एका फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीतून जमा झालेले 75 लाख रुपये लुटण्यात (robbingg cash) आले होते. या घटनेने शहरात खळबळ माजली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक आरोपी हा कंपनीचा कर्मचारीच असल्याचे समजते. पोलिसांनी आत्तापर्यंत 15 लाखांची कॅश जप्त केली असून या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा ते शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्टच्या रात्री मालाडमधील फॉरेक्स कंपनीचे दोन कर्मचारी , प्रतीक भोजाने आणि गणेश तळवळकर हे दोन बॅगांमधील असलेली 50 लाख आणि 25 लाखांची अशी एकूण 75 लाखांची रोकड घेऊन रिक्षातून जात होते. भाविक पटेल यांच्या मार्वे रोड येथील निवासस्थानी ही रोकड पोहोचवायची होती. मात्र ते पटेल यांच्या बिल्डींगजवळ पोहोचले असता, दुचाकीवरून तिघे जण आले. त्यापैकी दोघे खाली उतरले आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर ते लगेचच दुचाकीवरून फरार झाले, असे पोलिसांनी सांगितले.
यानंतर भोजाने याने तातडीने त्यांच्या मालकाला फोन लावून घडलेली (लुटीची) घटना सांगितली. याच कंपनीतील पार्टनर असलेले धवल पांचाळ (वय 36) यांनी तातडीने मालाड पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर पैसे लुटणाऱ्या आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी विविध पथके तैनात केली. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र अडाणे आणि निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी तांत्रिक तपासातून मिळालेल्या लीड्सवर काम करणाऱ्या पथकांवर सुपरव्हिजन केली आणि अखेरीस लोणावळा, पुणे, नाशिक, रायगड, जालना आणि मुंबई येथून सात आरोपींना अटक करण्यात आली. धक्कादायाक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक हा कंपनीचाच कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. ज्याच्याकडून पैसे हिसकावण्यात आले तोच या लुटीत सहभागी होता, असेही समोर आल आहे.
अभय गायकवाड, त्याचा भाऊ कुणाल गायकवाड, नरेश राठोड, छगन गायकवाड, दिनेश इंद्रे, विनोद अचलखांब आणि प्रतीक भोजाने अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार, प्रतीक भोजने यानेच आपल्या मालकाच्या कंपनीतील रोख रकमेची वाहतूक कशी होते, याची टीप इतर आरोपींना देत लुटीचा हा कट रचला होता. पोलिसांनी आरोपींकडून आत्तापर्यंत 15 लाखांची रोख रक्कम तसेच दोन बाईक्स आणि लुटीच्या गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेला चाकून जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, सध्या पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.