Cyber Crime | देशातील 80 टक्के सायबर गुन्हे या 10 जिल्ह्यातून ऑपरेट, अभ्यासातून धक्कादायक सत्य उघड
देशातील टॉप 10 जिल्ह्यांची नावे उघड झाली असून येथूनच देशातील 80 टक्के सायबर गुन्ह्यांची अमलबजावणी केली जात असल्याची धक्कादायक माहीती उघडकीस आली आहे.
नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : देशात वाढत्या ऑनलाईन व्यवहाराबरोबरच साबयर क्राईमने ( Cyber Crime ) उच्चांक गाठला आहे. लोकांना हातोहात फसवले जात असून सायबर गुन्हेगार देशाच्या कोणत्या कोपऱ्यातून सावज हेरत त्यांना लाखो रुपयांना गंडा घालत आहेत. आता आयआयटी कानपूर यांनी केलेल्या अभ्यासातून धक्कादायक सत्य समोर आले आहे. राजस्थानातील भरतपूर आणि उत्तर प्रदेशातील मथुरा हे सायबर क्राईमचे नवे हॉटस्पॉट बनले असून त्यांनी अनुक्रमे झारखंडच्या जामतारा आणि हरियानाच्या नूंहची जागा घेतली आहे.
आयआयटी कानपूर यांनी देशातील टॉप दहा जिल्ह्यांची नावे शोधली असून येथूनच देशातील 80 टक्के सायबर गुन्ह्यांची अमलबजावणी केली जात आहे. फ्युचर क्राईम रिसर्च फाऊंडेशन ( FCRC ) या नॉन प्रॉफीट संस्थेच्या माध्यमातून आयआयटी कानपूर संस्थेने हा अभ्यास केला आहे. या प्रकरणी एक व्हाईट पेपर काढण्यात आला आहे. त्याचे नाव ‘ए डीप ड्राईव्ह इनटू सायबर क्राईम ट्रेंड इम्पॅक्टींग इंडीया’ असे त्याचे नाव आहे.
ही आहे टॉप 10 जिल्ह्यांची यादी
‘ए डीप ड्राईव्ह इनटू सायबर क्राईम ट्रेंड इम्पॅक्टींग इंडीया’ या पेपरमध्ये दिलेल्या माहीतीनूसार देशातील दहा जिल्हे सायबर क्राईमचे हॉट स्पॉट बनले आहेत. त्यातूनच देशभरातील 80 टक्के सायबर क्राईम घडविण्यात येत आहेत. या जिल्ह्यात भरतपूर ( 18 टक्के ), मथुरा ( 12 टक्के ), नूंह ( 11 टक्के ), देवघर (10 टक्के ), जामतारा ( 9.6 टक्के ), गुरुग्राम ( 8.1 टक्के ), अलवर ( 5.1 टक्के ), बोकारो ( 2.4 टक्के ), कर्मा तंड ( 2.4 टक्के ) आणि गिरीधीह ( 2.3 टक्के ) यांचा समावेश असल्याचे फ्युचर क्राईम रिसर्च फाऊंडेशन ( FCRC ) संस्थेने म्हटले आहे.
खटला चालविणे कठीण
भारतातील टॉप 10 सायबर क्राईम जिल्ह्यांच्या विश्लेषणातून नागरी शहरांशी भौगोलिक जवळीकता, आर्थिक आव्हाने, सायबर सुरक्षेविषयी अपु्ऱ्या पायाभूत सुविधा, अत्यंत कमी डीजीटल साक्षरता अशी काही सामायिक कारणे यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. केवायसी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील सोपी पडताळणी प्रक्रिया गुन्हेगारांना बनावट ओळख निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे तपास यंत्रणांना त्यांचा शोध घेणे आव्हानात्मक बनले आहे, तर काळ्या बाजारात बनावट खाती आणि भाड्याने घेतलेले सिमकार्ड यामुळे सायबर गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे आणि खटला चालवण्याचे प्रयत्न गुंतागुंतीचे बनले असल्याचे अहवालात म्हटले आहे.