आश्रमात उपचारासाठी आलेल्या मुलीसोबत हैवानी कृत्य, बेदम मारहाण केली मग…
अन्नप्रसादात विष कालवल्याच्या संशयातून आश्रमात उपचारासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीला सेवकांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर आरोपींनी मुलीच्या तोंडात जळकं लाकूड घातले.
महासमुंद : छत्तीसगढ राज्यातील महासमुंद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आश्रमात उपचारासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीला बेदम मारहाण करत तिच्या तोंडात जळकं लाकूड घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सोनू पटेल, भोज साहू आणि राकेश दीवाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक आरोपींमध्ये आश्रमाचा संचालक आणि प्रधान गुरुचा समावेश आहे.
मुलीला उपचारासाठी आश्रमात ठेवण्यात आले होते
पीडित मुलगी मानसिक आजाराने ग्रस्त होती. यामुळे तिच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी आश्रमात ठेवले होते. आश्रमात अन्नप्रसादात विष घातल्याचा आरोप करत तीन सेवकांनी मुलीला बेदम मारहाण केली, मग तिच्या तोंडात जळकं लाकूड घातलं. यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आश्रमात धाव घेतली. यावेळी याबाबत कुठेही वाच्छता न करण्याची धमकी आरोपींनी कुटुंबीयांना दिली.
तिघांवर गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई
मात्र धमकीला न घाबरता मुलीच्या भावाने बागबाहरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु करत आश्रमचा संचालक, प्रधान गुरुसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींविरोधात कलम 302, 294, 506, 34 आणि 201 अन्वये कारवाई करण्यात आली. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.
पीडित मुलीला बागबहारा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन रायपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. या घटनेनंतर अशा प्रकारे भूत-बाधेचा इलाज करणाऱ्या सर्व आश्रमांवर नजर ठेवण्याचे आदेश महासमुंद पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.