झटपट अधिक पैसे कमावण्याचा नाद जीवावर बेतला, कर्जबाजारीपणातून उचलले टोकाचे पाऊल
झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने शॉर्टकर्ट मार्ग शोधला. यासाठी तो ऑनलाईन गेमच्या आहारी गेला. मात्र पैसे कमावण्याऐवजी पैसे गमावण्याची वेळ आली. मग पुढे जे घडलं ते भयंकर होतं.
पनवेल : झटपट पैसे कमावण्याच्या नादात एका व्यक्तीला जीव गमावण्याची वेळ आल्याची घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. पैसे कमावण्यासाठी सदर व्यक्ती जंगली रमी खेळत होता. यासाठी त्याने कर्ज काढून पैसे लावले होते. मात्र तो खेळात हरला आणि कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्याने स्वतःचे जीवन संपवले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र जंगली रमीतून घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. ऑनलाईन गेमचा आणखी एक बळी गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मयत व्यक्तीने घरी एकचे असताना हे टोकाचे पाऊल उचलले. मयताचा मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा त्याला वडील पंख्याला लटकलेले दिसले. त्याने तात्काळ वडिलांना खाली उतरवत उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला.
सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?
घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. यात झटपट पैसे कमावण्याच्या नादात आपण कर्ज काढून जंगली रमी खेळलो. पण रमीमध्ये आपण सर्व पैसे हरलो. त्यामुळे आपण कर्ज फेडू शकत नसल्याने नैराश्येतून हे टोकाचे पाऊल उचलत आहे. आपल्या मृत्यूला आपणच जबाबदार असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून, त्यानुसार नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार अधिक तपास करत आहेत.