उत्तर प्रदेशातील ‘या’ उद्योगपतीने स्वतःला संपवले, मुलायम कुटुंबीयांचे होते निकटवर्तीय, कारण अद्याप गुलदस्त्यात ?
राजेश गुप्ता यांचे लालराम पेट्रोप पंप आहे. शनिवारी गुप्ता हे पेट्रोल पंपाच्या एका खोलीत गेले आणि स्वतःवर गोळी झाडली.
उत्तर प्रदेश : अज्ञात कारणावरुन इटावातील मोठे उद्योगपती (Businessman) आणि मुलायम सिंहां (Mulayam Singh) चे निकटवर्तीय यांनी स्वतःचे जीवन संपवल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. राजेश गुप्ता असे मयत उद्योगपतीचे नाव आहे. गुप्ता यांच्या आत्महत्ये (Suicide)मुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी फ्रेंड्स कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस आत्महत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
गुप्ता यांनी पेट्रोल पंपाच्या खोलीत गोळी झाडली
राजेश गुप्ता यांचे लालराम पेट्रोप पंप आहे. शनिवारी गुप्ता हे पेट्रोल पंपाच्या एका खोलीत गेले आणि स्वतःवर गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकून पेट्रोलपंपावरील कर्मचारी खोलीकडे धावले. दरवाजा आतून बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.
जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले मात्र तत्पूर्वीच मृत्यू झाला
कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा तोडून पाहिले असता गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. जखमी अवस्थेत गुप्ता यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पेट्रोल पंप मालकाच्या आत्महत्येची माहिती मिळताच इटावाचे एसपी सिटी कपिल देव सिंह, पोलीस उपअधीक्षक अमित कुमार सिंह यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनेचा तपास करण्यासाठी पोहोचली. फॉरेन्सिक टीमने आत्महत्येशी संबंधित अनेक पुरावे एकत्र केले आहेत.
खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही
पोलिसांना खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. तसेच कुटुंबीयांनी कोणताही माहिती देण्यास नकार दिला. सुसाईड रूममध्ये समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव आणि त्यांचे पुत्र समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे फोटो लावलेले दिसले.
गुप्ता कुटुंबीय मुलायम सिंहांचे निकवर्तीय
राजेश गुप्ता यांचे वडील लाला रामप्रकाश गुप्ता हे मुलायम सिंह यादव यांच्या जवळचे आहेत. ते मूळचे सैफईजवळील गिंजा गावचे रहिवासी आहेत. राजेश गुप्ता यांचा इटावामध्ये मोठा व्यवसाय आहे. पेट्रोल पंप कोल्ड स्टोरेज व्यतिरिक्त मोटार कार एजन्सी देखील त्यांच्या कुटुंबाचे नाव आहे. राजेश गुप्ता यांच्या कुटुंबाचा इटावामधील उद्योगपतींच्या श्रेणीत समावेश होतो.