मंडप सजला, वऱ्हाडी जमले, पण भटजी शुभमंगल सावधान म्हणणार इतक्यात पोलीस दाखल झाले, कारण काय?
भोर तालुक्यात एका विवाह सोहळा सुरु होता. सर्व नातेवाईक, वऱ्हाडी मंडळींनी लग्नमंडप गजबजला होता. लग्नाचे विधी पार पाडले. पण शुभमंगल होण्याआधीच पोलीस मंडपात दाखल झाले.
विनय जगताप, TV9 मराठी, पुणे : पुण्यातील भोर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोरमधील नसरापूरमध्ये एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी हा विवाह सोहळा संपन्न होणार होता. विवाहाची सर्व तयारी झाली होती. मंडप सजला होता, वऱ्हाडी, नातेवाईक मंडपात पोहचले. मुहूर्ताची वेळ जवळ आली होती. नवरदेव पाटावर येणार आणि भटजी शुभमंगल सावधान म्हणणार इतक्यात मंडपात पोलिसांची एन्ट्री झाली. यानंतर लग्नाची वरात नवरदेवाच्या दारात जाण्याऐवजी थेट पोलीस ठाण्यातच गेली. याचे कारण म्हणजे वधू अल्पवयीन आहे. राजगड पोलिसांना आलेल्या निनावी फोननंतर पोलिसांनी मंगलकार्यालय गाठत 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजगड पोलिसात 15 जणांविरोधात गुन्हा दाखल
मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिचा विवाह लावून देणे दोन्हीकडील मंडळींना चांगलेच महागात पडले आहे. राजगड पोलिसांनी कारवाई करत नवरदेव आणि अल्पवयीन मुलीचे आई-वडील आणि नातेवाईक अशा 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम रामचंद्र राजिवडे या तरुणासोबत मुळशी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह रविवारी आयोजित केला होता.
निनावी फोननंतर पोलिसांची मंगल कार्यालयात धाव घेत कारवाई
मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना सुद्धा दोघांचे आई-वडील आणि नातेवाईक अल्पवयीन मुलीचा विवाह लावत असल्याबाबत राजगड पोलीस ठाण्यात निनावी फोन आला. या फोननंतर पोलीस शिपाई सचिन नरुटे, मंगेश कुंभार, प्रशांत राऊत यांनी मंगल कार्यालयात धाव घेतली. पोलिसांनी नवरी मुलीच्या जन्म तारखेची शहानिशा केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा असल्याचे संबंधितांना सांगून राजगड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सचिन नरुटे यांनी फिर्याद दिली.
बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई
या विवाह प्रकरणी नवरा मुलगा शुभम रामचंद्र राजिवडे, त्याचे वडील रामचंद्र निवृत्ती राजिवडे, आई सीता रामचंद्र राजिवडे, मामा अनिल रामभाऊ रेणुसे, मामी वैशाली अनिल रेणुसे, आकाश सुनील राजिवडे, अभिषेख रवींद्र चव्हाण, कुणाल मधुकर शिरोळे, चैतन्य रामचंद्र राजीवडे, शंतनू शिवाजी पवार, कुशाल मधुकर शिरोळे आणि लग्न लावणारे ब्राम्हण सुनीलकाका खासनीस तसेच अल्पवयीन मुलीचे आई, वडील, मामा, मामी आणि इतर नातेवाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले.