खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्याने पैसे कट झाले, माथेफिरु ग्राहकाने बँक मॅनेजरला चाकूने भोसकले !
बँकेच्या नियमानुसार सेव्हिंग खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य आहे. मात्र चिंटू उर्फ फिरोज नामक ग्राहकाच्या खात्यात मिनिमम बॅलन्सही नसल्याने बँकेने चार्ज लावला.
रांची : बँक खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्याने पैसे कट झाले म्हणून संतापलेल्या माथेफिरु ग्राहकाने बँक मॅनेजरवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना रांचीत घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बँकेत एकच गोंधळ उडाला. हल्ला केल्यानंतर आरोपी ग्राहक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्याने पैसे कट झाले
रांचीतील कांटा टोली येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत ही धक्कादायक घटना घडली आहे. बँकेच्या नियमानुसार सेव्हिंग खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य आहे. मात्र चिंटू उर्फ फिरोज नामक ग्राहकाच्या खात्यात मिनिमम बॅलन्सही नसल्याने बँकेने चार्ज लावला.
आरोपी दररोज बँकेत वाद घालायचा
यामुळे फिरोज संतापला आणि दररोज बँकेत येऊन वाद घालायचा. जवळपास सहा महिने त्याचा बँकेत येऊन गोंधळ सुरु होता. शुक्रवारी फिरोज पुन्हा बँकेत आला आणि थेट मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. यानंतर त्याने बँकेच्या नियमांबाबत मॅनेजरशी वाद करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेला अन् आरोपीने थेट चाकूहल्लाच केला
वाद इतका वाढला की फिरोजने स्वतःजवळील चाकू काढला आणि मॅनेजरवर हल्लाबोल केला. फिरोजने चाकूने मॅनेजरवर अनेक वार केले. या हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे.
बँकेत उपस्थित ग्राहक आणि इतर कर्मचाऱ्यांना काही कळायच्या आत फिरोज मॅनेजरवर वार करुन पळून गेला. जखमी मॅनेजरला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.