आधी नैनीताल मग जयपूर फिरायला गेले कुटुंब, हॉटेलमधून रिक्षात बसले अन् त्यानंतर परतलेच नाही, कुटुंबासोबत काय घडलं?
आग्रा येथील औषध व्यापारी आपल्या कुटुंबासोबत नैनीताल फिरायला गेले. तेथून एन्जॉय करुन घरी परतले. यानंतर कार घरी उभी करुन पुन्हा भाड्याच्या कारने जयपूरला गेले, मात्र पुन्हा परतलेच नाहीत.
आग्रा : उत्तर प्रदेशातील औषध व्यापारी कुटुंबासह जयपूरला गेले. तेथे एक रात्र काढल्यानंतर सकाळी रिक्षा पकडून कुटुंब कुठेतरी गेले. मात्र यानंतर ते पुन्हा परतलेच नाही. दोन आठवडे झाले तरी कुटुंबाचा पत्ता लागत नसल्याने सर्वच हैराण झाले आहेत. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या भावाने ट्रान्स यमुना पोलीस ठाण्यात भावाचे कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस बेपत्ता कुटुंबाचा शोध घेत आहेत. राजेश शर्मा असे बेपत्ता व्यापाऱ्याचे नाव आहे. बेपत्ता झाल्याापासून सर्वांचे फोनही बंद येत आहेत. पोलिसांनी शर्मा कुटुंबाचा शोध सुरु केला आहे. पोलीस राजेश शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाचा सर्वत्र शोध घेत आहेत. राजेश शर्माचे मित्र, व्यवसायातील प्रतिस्पर्धी आणि आग्रा येथील व्यवहारांशी संबंधित लोकांची माहिती पोलीस गोळा करत आहेत.
आधी नैनीतालला गेले, तेथून घरी परतले
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील 50 वर्षीय औषध विक्रेते राजेश शर्मा हे 15 एप्रिल रोजी कुटुंबासह नैनीतालला फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीमा शर्मा, मुलगी काव्या, मुलगा अभिषेक, सून उषा आणि एक वर्षाचा नातू होता. नैनीतालला जाताना राजेशने फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केले. त्यानंतर ते तेथून आपल्या घरी परतले.
कार घरी उभी केली अन् जयपूरला गेले
नैनीतालहून परतल्यानंतर शर्मा यांनी कार घरी उभी केली. यानंतर कोणालाही न सांगता भाड्याने घेतलेल्या इनोव्हा कारमधून संपूर्ण कुटुंबासह जयपूरला गेले. रात्री उशिरा तेथे पोहोचले आणि एका हॉटेलमध्ये थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास हॉटेलमधून ऑटो घेऊन कुठेतरी निघाले. यानंतर राजेश आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
संपूर्ण कुटुंब नॉट रिचेबल
मोबाईल बंद असल्याने नातेवाईक कुटुंबातील कोणाशीही संपर्क करू शकत नाही. शर्मा यांचे भाऊ रमाकांत याच्यासोबत 23 एप्रिल रोजी शेवटचे बोलणे झाले होते. सध्या भाऊ रमाकांतने आग्रा येथील ट्रान्स यमुना पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. कुटुंबाच्या अशा अचानक बेपत्ता होण्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.