मैत्रित जुना वाद नडला… जिवा-भावाच्या मित्रांनीच घेतला जीव… दहा दिवस मृत्यूशी झुंज देवूनही अपयश…
जुन्या भांडणाची कुरापत काढून करण्यात आलेल्या हल्ल्यात अक्षय गायकवाड आणि मयूर जाधव हे दोन्ही गंभीर जखमी झाले होते.
Nashik Crime : नाशिकमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना (Nashik Crime News) घडली आहे. जवळच्याच चौघा मित्रांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली होती. प्राणघातक हल्ल्यात (Attacked) जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नाशिकच्या नाशिकरोड (Nashikroad Police) पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय गायकवाड आणि त्याचा मित्र मयूर जाधव हे दोन्ही नाशिकरोड येथील सामानगावरोड येथून जात असतांना त्यांच्याशी अक्षय याच्या मित्राने वाद घालण्यास सुरुवात केली. जुन्या भांडणाची कुरापत काढून अक्षय याच्यावर संशयित उमेश गायधनी, ऋषी तुंगार, निखिल गायके, गोपी पवार यांनी लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने हल्ला केला. यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या मयूर जाधव याच्यावर हल्ला करण्यात आला होता. दसऱ्याच्या दिवशीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात होती.
जुन्या भांडणाची कुरापत काढून करण्यात आलेल्या हल्ल्यात अक्षय गायकवाड आणि मयूर जाधव हे दोन्ही गंभीर जखमी झाले होते.
लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने हल्ला केल्याने खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या दहा दिवसापासून उपचार सुरू होते.
मात्र, उपचारादरम्यान अक्षय गायकवाड या युवकाचा मृत्यू झाला असून मयूर याचीही परिस्थिती गंभीर आहे.
या प्रकरणातील उमेश गायधनी, ऋषी तुंगार, निखिल गायके, गोपी पवार या संशयितांवर गुन्हा दाखल होता मात्र अक्षयच्या मृत्यूनंतर चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित संशयितांविरुद्ध न्यायालयात यासंबंधी प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
या गुन्ह्यातील तीन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून यातील एक फरार आरोपीचा नाशिकरोड पोलीसांचे पथक शोध घेत आहे.