रात्री रुममध्ये झोपले होते आई-वडिल, अचानक मुलगा आत आला अन् क्षणात…
नेहमीप्रमाणे रात्री जेवण करुन सर्व कुटुंबीय आपापल्या रुममध्ये झोपी गेले. यानंतर मध्यरात्री घरात अचानक आरडाओरडा सुरु झाला. आवाज ऐकून सर्व जागे झाले. त्यानंतर जे दृश्य दिसले ते पाहून सर्वांना धक्काच बसला.
अलीगढ : उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रात्री आपल्या खोलीत झोपलेल्या आई-वडिलांची माथेफिरु मुलाने हत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणाने आधी आईला संपवले, मग 38 सेकंदात 47 वार करुन वडिलांना संपवले. हत्या केल्यानंतर तरुण आई-वडिलांच्या मृतदेहाशेजारीच बसून राहिला. वृद्ध जोडप्याचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील सदस्य धावत आले, पण दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेत आरोपी मुलाला अटक केली.
मध्यरात्री आई-वडिलांच्या रुममध्ये जाऊन हल्ला केला
गुलाम मुहिउद्दीन असे आरोपीचे नाव असून, तो अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये बीकॉमचे शिक्षण घेत आहे. गुलाम आपले आई-वडिल आणि तीन भावंडासोबत जाकीर नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. बुधवारी रात्री गुलाम आपल्या भावंडांसोबत एका रुममध्ये झोपला होता. तर आई-वडिल दुसऱ्या रुममध्ये झोपले होते. मध्यरात्री 3 वाजता गुलाम आई-वडिलांच्या रुममध्ये गेला आणि आतून कडी लावून घेतली. त्यानंतर जीवघेणा हल्ला करुन त्याने आई-वडिलांना संपवले.
गुलामने आधी आईला संपवले, मग वडिलांवर 47 वार केले. दोघांचा आरडाओरडा ऐकून कुटुंबातील इतर सदस्य जागे झाले. मात्र रुमचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांना आत जाता येईना. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. यावेळी रुममध्ये आई-वडिलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. गुलाम मृतदेहाशेजारी बसला होता.
मनोरुग्ण आहे गुलाम
गुलामला मानसिक आजार आहे. त्याला सतत वाटायचे की, आपले आई-वडिल आपली हत्या करु इच्छितात. कुटुंबीय त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचारही करत होते. काही दिवसांपूर्वी गुलाम घरुन पळूनही गेला होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याला शोधून घरी परत आणले होते. गुलामचे वडिल इमाम होते. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.