मुलीसह रस्ता ओलांडत होती महिला, अचानक भरधाव कार आली अन्…
रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकीला भरधाव कारने उडवल्याची अंगावर काटा आणणारी घटना दिल्लीत घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
नवी दिल्ली : रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. धडक दिल्यानंतर दोघीही काही फूट अंतरावर फेकल्या गेल्या. राजधानी नवी दिल्लीतील हरिद्वार-दिल्ली महामार्गावर ही घटना घडली. घटना पाहून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मायलेकाची सध्या मृत्यूशी झुंज सुरु आहे. दोघींवर जवळच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेने राजधानी नवी दिल्लीतील रस्त्यांवर भरधाव वेगाने ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दुभाजकावर आदळली स्विफ्ट कार अन भयानक अपघात घडला
दिल्ली-हरिद्वार महामार्गावर एक महिला तिच्या लहान मुलीचा हात पकडून रस्ता ओलांडत होती. तिने एका बाजूचा रस्ता ओलांडला आणि ती दुभाजकाजवळ उभी राहून दुसऱ्या बाजूचा रस्ता ओलांडण्याच्या तयारीत होती. तितक्यातच दिल्लीकडून आलेल्या भरधाव वेगातील स्विफ्ट कार जोराने दुभाजकावर आदळली. यादरम्यान दुभाजकाजवळ उभ्या राहिलेल्या मायलेकाला जोरदार धडक बसून ते उंच फेकले गेले आणि काही फुटांच्या अंतरावर जाऊन कोसळले.
घटना सीसीटीव्हीत कैद
या अपघातात दोघी मायलेकिंना जबर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. संपूर्ण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात मायलेकीला जोरदार धडक बसल्याचे दिसत आहे. तसेच गाडी किती प्रचंड वेगाने धावत होती, याचा अंदाज येत आहे. मात्र कारची ओळख पटवणे मुश्किल झाले आहे. कारने धडक दिल्यानंतर कारचालक तेथून सरळ निघून गेला. परिसरातील रहिवाशांनी अपघातात जखमी मायलेकीला वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात नेले.
दिल्ली-हरिद्वार महामार्गावर गाड्यांची वर्दळ वाढली आहे. या महामार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अनेक वर्षांपासून चिंता व्यक्त होत आहे. वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करीत नसल्यामुळे जीवघेण्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. नुकताच घडलेला भयानक अपघातही अशाच भरधाव ड्रायव्हिंगमुळे घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या महामार्गावरील गाड्यांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.