‘तो’ आपल्या पत्नीला शोधत होता, लोकांना वाटले चोर आला; मग…
एक व्यक्ती आपल्या पत्नीचा शोध घेत होता. रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरताना पाहून लोकांना त्याच्यावर चोर असल्याचा संशय आला. या संशयातून पुढे जे घडले ते भयंकर.
इटावा : उत्तर प्रदेशातील इटावा येथे धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा शोध घेत असलेल्या पतीला चोर समजून नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना सिव्हिल लाईन परिसरातील रेल्वे रोडवरील चौधरी पेट्रोल पंपासमोर घडली. बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केली आहे. अमजद असे मयत पतीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रस्त्यावर गाडी उभी करुन पत्नीचा शोधत होता
रेल्वे रोडवरील चौधरी पेट्रोल पंपाजवळ गल्लीबोळात एक बर्थ डे पार्टी सुरु होती. त्यामुळे अमजदने आपली गाडी रस्त्यावर पार्क केली आणि तो आपल्या पत्नीला शोधत होता. अमजदला इकडे तिकडे डोकावताना पाहून तेथे उपस्थित नागरिकांना संशय आला. नागरिकांना वाटले परिसरात चोर फिरत आहे.
चोर समजून लोकांनी बेदम मारहाण केली
लोकांनी चोर समजून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मारहाणीत अमजद गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पिता-पुत्राला अटक केली आहे.
अमजदची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता आणि इकडे तिकडे पत्नीला शोधत होता. तेथे उपस्थित काही लोकांनी त्याला चोर समजून बेदम मारहाण केली. आम्हाला न्याय हवा आहे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी सरकारकडे मागणी आहे, असे अमजदच्या पत्नीने म्हटले आहे.