पैशाचा वाद जीवावर बेतला, साताऱ्यात खाजगी सावकाराची निर्घृण हत्या
अधिक तपास केला असता पोलिसांना जाधव यांनी ज्या लोकांना व्याजाने पैसे दिलेत, त्यापैकी तीन लोकांनी हत्येचा कट रचून जाधव यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सातारा : व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वादातून खाजगी सावकाराची हत्या केल्याची घटना साताऱ्यातील खोडद येथे उघडकीस आली आहे. मयत सावकार आठ दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यात येत होता, मात्र त्याची हत्या झाल्याचे निष्पन झाले आहे. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून, आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. विलास जाधव असे हत्या करण्यात आलेल्या सावकाराचे नाव आहे.
जेवायला जातो सांगत घरातून बाहेर गेले
विलास जाधव हे 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बाहेर जेवायला जातो, असे पत्नीला सांगून घरातून गेले. मात्र ते घरी परतलेच नाहीत. यामुळे त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी 22 नोव्हेंबर रोजी बोरगाव पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली.
जाधव यांचा घातपात झाला असावा, असाही संशयही त्यांच्या नातवेईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपास सुरु केला.
तपासादरम्यान जाधव यांनी अनेकांना व्याजाने पैसे दिल्याचे कळले
तपासादरम्यान विलास जाधव यांनी अनेक लोकांना व्याजाने पैसे दिल्याची माहिती मिळाली. त्याआधारे तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास केला.
यादरम्यान, जाधव यांच्या एका नातेवाईकाने जाधव यांना दोन इसमांसोबत चारचाकी वाहनातून जाताना निसराळे फाटा येथे पाहिल्याचे जयश्री जाधव यांना सांगितले. त्यानुसार 28 नोव्हेंबर रोजी जयश्री जाधव यांनी बोरगाव पोलिसांकडे धाव घेत हत्येच्या उद्देशाने विलास जाधव यांना पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.
पैसे घेणाऱ्या लोकांनीच जाधव यांची हत्या केल्याची माहिती मिळाली
अधिक तपास केला असता पोलिसांना जाधव यांनी ज्या लोकांना व्याजाने पैसे दिलेत, त्यापैकी तीन लोकांनी हत्येचा कट रचून जाधव यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तिन्ही आरोपींना निसराळे फाटा येथून ताब्यात घेतले. तिघांची कसून चौकशी केली असता आरोपींनी हत्येची कबुली दिली.
पैशासाठी जाधव त्रास द्यायचे म्हणून केली हत्या
आरोपींपैकी दोघांनी जाधव यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. सदरचे पैसे परत करण्याकरीता विलास जाधव शिवीगाळ दमदाटी करत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून या दोघांनी आपल्या एका साथीदारासह मिळून कट करून जाधव यांची हत्या केल्याचे सांगितले.
गुन्हयातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना मयत जाधव यांचा मृतदेह टाकून दिलेल्या ठिकाणी घेऊन जात मृतदेह ताब्यात घेण्यात आला.