आत्ताच्या आत्ता पैसे आणून दे नाहीतर पतीच्या किडन्या विकून टाकेल…समोर आली धक्कादायक घटना
मोबाइलचे लोकेशन घेऊन तात्काळ पोलिसांचे पथक सिन्नरच्या दिशेने रवाना झाले होते, त्यावरून भावसार यांची सुटका करत दोघांना अटक केली आहे.
नाशिक : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात एका पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन खळबळ उडाली आहे. साडेसात लाख रुपये आत्ताच्या आत्ता आणून दे नाहीतर तुझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या विकून टाकील अशी धमकी आपल्याच पतीच्या मोबाइलवरुन आल्याने महिलेला मोठा धक्का बसला होता. महिलेने नातेवाईकांना ही बाब सांगितल्यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन ही माहिती देण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून अश्विनी भावसार या महिलेने अंबड पोलीस ठाण्यात संपूर्ण हकिगत सांगितली. त्यात त्यांनी म्हंटलं होतं की, माझे पती भूषण भावसार यांना सकाळी सात वाजता घरातून वैभव माने आणि त्याच्यासोबत एक पुरुष आणि महिला होती. यांनी मिळून दुचाकीवर बसवून अपहरण केले होते. घरात येऊन शिवीगाळ करत मारहाण करत पतीला घेऊन गेले होते, मात्र पैशांचा वाद असल्याने महिलेने ही बाब कुणालाही सांगितली नाही. पतीच्या मोबाइलवर फोन केले मात्र प्रतिसाद मिळत नव्हता.
अशातच सायंकाळी पतीच्याच मोबाइलवरुन फोन आला आणि आत्ताच्या आत्ता साडेसात लाख रुपये दे नाहीतर तुझ्या पतीच्या दोन्ही किडन्या विकून टाकील अशा धमकीचा फोन आला.
महिलेने लागलीच ही बाब नातेवाईकांना सांगितली त्यानंतर त्यांच्या सल्यानुसार पोलिसांत ही माहिती दिली त्यावरून पोलीसांनी महिलेची फिर्याद घेत गुन्हा दाखल केला आहे.
उसने घेतलेल्या पैशावरून हा वाद झाल्याचे समोर आले असले तरी घडलेली घटना गंभीर असल्याने पोलीसांनी याबाबत दखल घेत अधिकचा तपास सुरू केला.
मोबाइलचे लोकेशन घेऊन तात्काळ पोलिसांचे पथक सिन्नरच्या दिशेने रवाना झाले होते, त्यावरून भावसार यांची सुटका करत दोघांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन भावसार यांनी फायनान्सकडून लोन करून देण्यासाठी कार्यालय सुरू केले होते, त्यावरून त्यांनी पैसे घेतल्याच्यावरुन हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.