Chandrapur Kidnapping : शाळेला दांडी मारली, पालक रागावू नये म्हणून अपहरणाचा बनाव, चंद्रपूरमध्ये दहा वर्षाच्या मुलाचे प्रताप
टीव्ही क्राईम शो पाहून मुलाला अपहरणाची कल्पना सुचली. त्याप्रमाणे मुलाचे अहरणाची कथा रचली. शाळा सुटल्यानंतर मुलगा उशिरा घरी पोहचला. घरी गेल्यानंतर त्याला पालकांनी शाळेतून उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यावर मुलाने आपले एका मालवाहू ट्रकचालकाने अपहरण केले.
चंद्रपूर : शाळेला दांडी मारली म्हणून पालक रागावतील, या भीतीने एका दहा वर्षाच्या मुलाने स्वतःच्याच अपहरण (Kidnapping)चा बनाव केल्याची घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली आहे. टीव्हीवरील क्राईम शो (Crime Show) पाहून मुलाने स्वतःच्याच अपहरणाची कथा रचली. मुलाचा बनाव (Fake) उघडकीस आल्यानंतर पालकांसह पोलिसही चक्रावून गेले. मुलाने सांगितलेल्या कहाणीनुसार पोलिसांनी अपहरणाचा तपास केला. मात्र पोलिसांना काहीच सुगावा लागत नव्हता. अखेर पोलिसांनी मुलाला विश्वासात घेऊन माहिती काढली असता मुलाने सत्य कथन केले. सत्य ऐकल्यानंतर पोलिसांची बोलतीच बंद झाली.
शाळेला दांडी मारल्याने पालक ओरडतील म्हणून अपहरणाचा बनाव
चंद्रपूर शहरालगतच्या पडोली येथील एक मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून गेला. मात्र तो शाळेत गेलाच नाही. खरंतर मुलाने शाळेला दांडी मारली. मात्र घरी गेल्यावर पालक ओरडतील ही भीती मुलाच्या मनात होती. यामुळेच मुलाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला. टीव्ही क्राईम शो पाहून मुलाला अपहरणाची कल्पना सुचली. त्याप्रमाणे मुलाचे अहरणाची कथा रचली. शाळा सुटल्यानंतर मुलगा उशिरा घरी पोहचला. घरी गेल्यानंतर त्याला पालकांनी शाळेतून उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यावर मुलाने आपले एका मालवाहू ट्रकचालकाने अपहरण केले. आपण त्याच्या तावडीतून कसाबसा सुटलो अशी कहाणी पालकांना सांगितली. मुलाचे बोलणे ऐकून पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलाने पोलिसांनाही तीच कहाणी कथन केली.
पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारले असता सत्य उघड
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य दाखवत मुलाने सांगितलेल्या मेटाडोरचा नंबर व चालकाची महामार्ग तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर देखील तपास पथकाच्या हाती काहीच सुगावा लागला नाही. अखेर काही तासांनी पोलिसांनी मुलाला विश्वासात घेऊन माहिती काढल्यावर खरी कहाणी पुढे आली. अगदी सहज दृष्टीस पडणाऱ्या टीव्हीवरील क्राईम सिरीयल आणि हातात असलेले मोबाईलवरचे गुन्हे विषयक कार्यक्रम आणि गेम्स यामुळे अल्पवयीन मनांवर किती खोलवर परिणाम केलाय, याचे हे ताजे उदाहरण म्हटले पाहिजे. (A ten year old boy faked his own kidnapping in Chandrapur)