आजीची लुटमार करणाऱ्या चोरट्याला नातीने दिला चोप, घटना सीसीटीव्हीत कैद
पुण्यातील शिवाजीनगर परिसरात आजीचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या चैन स्नॅचरला नातीने चोप दिला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
पुणे : महाराष्ट्रातील पुण्यात चैन स्नॅचिंगची एक घटना समोर आली आहे. आजीच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीस्वाराला नातीने चोप दिल्याची घटना शिवाजीनगर परिसरात घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, चिमुकलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. लता घाग असे आजीचे नाव असून, ऋत्वी घाग असे नातीचे नाव आहे.
शिवाजीनगर परिसरात घडली घटना
पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत बुधवारी रात्री आठच्या सुमारास 60 वर्षीय लता घाग या दोन नातींसोबत घरी चालल्या होत्या. दरम्यान, दुचाकीवरुन हेल्मेट घातलेला एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि पत्ता विचारू लागला. लता या तरुणाच्या जवळ येताच त्याने धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला.
आजी-नातीने चोरट्याला चोपले
तरुणाचा इरादा लक्षात येताच लता घाग आणि त्यांची ऋत्वी घाग यांनी चोरट्याला चोप देण्यास सुरुवात केली. आजी-नातीचा रौद्र अवतार पाहून चोरटा गाडीचा वेग वाढवून तेथून निघून गेला. यावेळी लता घाग या रस्त्यावर खाली पडल्या असून, त्यांना किरकोळ जखम झाली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.
ज्यूस सेंटरमधून 85 हजाराची चोरी
बुलढाणा शहरातील लकी ज्यूस सेंटरमध्ये तब्बल 85 हजाराची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. दुकानमालक सकाळी दुकान उघडायला आल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची पोलिसात तक्रार देण्यात आली असून, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.