कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर खुलेआमपणे लूटमार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कल्याण गुन्हेगारांना कायद्याचा, पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे चित्र दिसते. रेल्वे स्थानकाबाहेर महिलेच्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच आता दुसरी घटना उघडकीस आली आहे.
कल्याण : कल्याण पश्चिमेतील स्कायवॉकखाली 5 ते 6 जणांच्या टोळीने गोंधळ घातला. एका इसमाला लुटत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. सध्या याप्रकरणी दोन-तीन पोलीस कामकाजाच्या हद्दीतील बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस व्हिडिओच्या आधारे तपास करत आहे. मात्र सतत अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसत आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण रेल्वेस्थानकाबाहेर टोळक्याचा हैदोस
कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर पुन्हा लुटपाट करणाऱ्या टोळक्याचा हैदोस सुरू झाला आहे. पोलिसांचा धाक राहिला नसल्याने आता कल्याण पश्चिमेतील स्कायवॉकखाली खुलेआमपणे 5 ते 6 जणांच्या टोळक्याचा हैदोस सुरु आहे. स्टेशन परिसरात फिरत असलेल्या एका इसमाला मारहाण आणि दमदाटी करत त्याच्या खिशातील रोकड घेऊन पळ काढल्याची घटना घडली. लुटपाट करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
याप्रकरणी कल्याण पश्चिम बाजार पेठ पोलीस आणि कल्याण महात्मा फुले पोलिसांनी व्हायरल व्हिडिओच्या साह्याने तपास सुरू केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच स्टेशनवर कामावर जाणाऱ्या एका महिलेचा नशा करणाऱ्या गर्दुल्यांकडून विनयभंग करण्यात आला होता. त्यानंतर मनसे आक्रमक होऊन रेल्वे लोहमार्ग पोलिसांना स्टेशन परिसरातील नशा करणारे गर्दुल्ले यांना पंधरा दिवसात बाहेर काढले नाही, तर मनसे स्टाईल दाखवण्याचा इशारा दिला होता. तरीही अशा प्रकारचे लूटपाट स्टेशन परिसरात घडत असल्याने पोलिसांचा धाक गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे चित्र कल्याण स्टेशन परिसरात दिसून येत आहे.