पतीच्या एका फोन आला अन् पत्नीने आयुष्य संपवलं; कारण काय?
पतीच्या या विधानामुळे ती प्रचंड अस्वस्थ झाली आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तर प्रदेशच्या बांदा येथे ही धक्कादायक घटना घडली.
बांदा : सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात संसारात मोठ्या प्रमाणावर कटुता येऊ लागली आहे. दाम्पत्ये छोट्या-छोट्या कारणावरूनही दोघांमधील वाद टोकाला नेत आहेत. यात अनेकदा अशा प्रकारचा वाद जीवावर बेतत आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेने पती-पत्नीमधील नात्यात किती दुरावा आला आहे, याची प्रचिती आणून दिली आहे. पतीने पत्नीला फोन कॉल केला आणि पत्नी जागेवरच कोसळून पडली. तिला पतीच्या तोंडून आलेल्या शब्दांमुळे बसलेला धक्का अनावर झाला आणि तिने लगेचच स्वतःला संपवून घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पतीने तिला सोडून देण्याचे आणि दुसरे लग्न करणार असल्याचे सांगितले. पतीच्या या विधानामुळे ती प्रचंड अस्वस्थ झाली आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
उत्तर प्रदेशच्या बांदा येथे ही धक्कादायक घटना घडली. एका निष्पाप, सामान्य गृहिणीने पतीच्या दुसर्या वैवाहिक संबंधाच्या धक्क्यातून जीवन संपवल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
झाडाला गळफास घेऊन संपवले स्वतःचे जीवन
महिलेने पतीच्या फोन कॉलनंतर लगेचच शेजारचे जंगल गाठले आणि आसपास कुणी नसल्याचे पाहून झाडाला गळफास घेतला. स्थानिक रहिवाशांकडून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर तपासाची पुढे चक्रे फिरली. त्यातून पतीच्या फोन कॉल्सची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
सासरच्या जाचाला कंटाळून गाठले होते माहेर
आत्महत्या करणार्या महिलेचा पती तसेच सासरच्या इतर मंडळींकडून पराकोटीचा छळ केला जात होता. वारंवारच्या छळाला कंटाळून तिने माहेर गाठले होते. तिला तान्हुले बाळदेखील होते. पतीच्या त्रासाला ती एवढी कंटाळली होती की तिने तान्हुल्या बाळाचाही विचार न करता स्वतःचे जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
पतीच्या जाचाला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच परिसरात सर्वांनाच धक्का बसला. आपल्या मुलीने सासरच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या केली. त्यामुळे पती व सासरच्या इतर लोकांवर कठोर कारवाई व्हावी, त्यांना वेळीच शिक्षा व्हावी, अशी मागणी मृत महिलेच्या वडिलांनी केली आहे.