प्रेमाच्या त्रिकोणाचा भयानक अंत, जुना आणि नविन प्रियकरांमध्ये भररस्त्यात जुंपली; मग जे घडले ते भयानकच !
स्टेशनवर त्यांची गाडी थांबताच बाहेर जाण्याचा मार्ग विचारेपर्यंत कोळसेवाडी पोलिसांच्या टीमने त्यांना मध्य प्रदेशच्या बुरहानपूर रेल्वे स्टेशनवरच ताब्यात घेतले.
कल्याण : प्रेयसीच्या मोबाईलमध्ये पहिल्या प्रियकराचा नंबर आढळल्याने संतापलेल्या नवा प्रियकर जाब विचारण्यास गेला. यावेळी झालेल्या वादातून पहिल्या प्रियकराने आपल्या मित्रांच्या मदतीने भररस्त्यात चाकूहल्ला करत नव्या प्रियकराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याणमधील विठ्ठलवाडी परिसरात ही भयानक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मध्य प्रदेशात फरार झाले. मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत 24 तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे.
आदित्य बरर असे हत्या करण्यात आलेल्या नवीन प्रियकराचे नाव आहे. ललित उज्जैनकर, राहुल चव्हाण, सागर गांगुर्डे, नकुल भोईटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबईच्या मानखुर्द गोवंडी परिसरात राहणाऱ्या आदित्य बरर याचे कल्याण विठ्ठलवाडी परिसरातील राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र आदित्य आधी तिचे ललित नावाच्या मुलाशी प्रेमप्रकरण सुरू होते. हे रिलेशन जवळपास चार वर्षे सुरू होते.
दोघांचं लग्नही ठरणार होते. मात्र ललित व्यसनांच्या आहारी गेलेला असल्यामुळे तरुणीच्या आईने त्यांच्या लग्नाला विरोध करत मुलीला दिव्यात आपल्या भावाकडे पाठवले. यादरम्यान ती आदित्यच्या संपर्कात आली. ही जवळीक वाढत गेली आणि या दोघांच प्रेम प्रकरण सुरू झालं.
या दरम्यान दोन दिवसापूर्वी आदित्यला तिच्या मोबाईलमध्ये तिचा जुना प्रियकर ललित याचा नंबर मुलीच्या नावाने सेव केलेला दिसून आला. मग काय आदित्यचा पारा चढला. प्रेयसीचे पहिल्या प्रियकराशी पुन्हा प्रेमसंबंध सुरु असल्याचा त्याला संशय आला. यावरुन तो तरुणीसह तिच्या जुन्या प्रियकराशी वाद घालू लागला.
ललितने आदित्यला आपल्यात आणि तरुणीमध्ये कोणतंही नातं नसल्याचं समजून सांगितले. तसेच तरुणीचे कुत्र्याचे पिल्लू आपल्याकडे आहे ते एकदाच घेऊन जा असे सांगत त्याने वाद मिटवण्यास सांगितला.
भररस्त्यात पहिल्या प्रियकराने दुसऱ्याला संपवले
यानंतर आदित्य आणि त्याची प्रेयसी कल्याण विठ्ठलवाडी परिसरात ललितच्या घराजवळ पोहोचले. बोलता बोलता दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. या वादात ललितने आणि त्याच्या चार मित्रांनी मिळून आदित्यला मारहाण करत, त्याच्या छातीवर चाकूने वार करत जागीच ठार केले.
चारही आरोपींनी तेथून पळ काढत मध्यप्रदेश गाठले. मात्र या आरोपींना माहिती नव्हतं त्यांचा पाठलाग करत कल्याण कोळसेवाडी पोलीस मध्य प्रदेशमध्ये पोहोचले होते.
पोलिसांकडून 24 तासाच्या आत आरोपींना अटक
स्टेशनवर त्यांची गाडी थांबताच बाहेर जाण्याचा मार्ग विचारेपर्यंत कोळसेवाडी पोलिसांच्या टीमने त्यांना मध्य प्रदेशच्या बुरहानपूर रेल्वे स्टेशनवरच ताब्यात घेतले. सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सुनील गवळी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे,सहायक पोलिस निरीक्षक पगारे, पोलीस हवालदार हनुमंत शिर्के, प्रमोद जाधव, सचिन कदम, मिलिंद बोरसे यांच्या पथकाने कामगिरी करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.