पुढच्या जन्मी नक्की देशमुख होऊन येतो,आय लव्ह यु आशु सांभाळ सगळं, बाय ! तरुणाने मॅसेज करुन जीवन संपवले…
तो म्हणायचा ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, ती पोरगी म्हटली तुझ्यासोबत लग्न केले नाही तर मरून जाते. म्हणून त्याच्या घरच्यांनी येऊन माझ्या भावाला मारलं होते त्यानंतर पुन्हा त्याला धमकी आल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचं दुर्दैवी तरुणाच्या बहिणीने म्हटले आहे.

नांदेड येथे एका तरुणाचे तथाकथित उच्च जातीच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण होतं. या तरुणाला मुलीच्या घरच्यांनी दोनदा मारहाण केली होती. अखेर मुलीचे वडील लग्नाला तयार झाले परंतू तिचे काका आणि अन्य मंडळींना घोळ घातला. आणि आम्ही तुला मारायला येतोय अशी धमकी देत मुलीच्या काकाने धमकी दिल्यानंतर मुलाने अखेर आपल्या प्रेयसीला शेवटचा टेक्स्ट मॅसेज टाकून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नांदेड येथील सुगावात एका प्रेमकहाणीचा शेवट धक्कादायक झाला आहे. नांदेड तालुक्यातील सुगाव येथील नितीन शिंदे याचे गावाजवळ असलेल्या दुसऱ्या गावातील एका मुलीसोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र ही बाब मुलीच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांनी नितीन शिंदेंना फोन करून धमकी दिली. आमच्या मुलीच्या नादी लागू नको म्हणून नितीनला मारहाण देखील केली होती. त्यानंतर 18 तारखेला मुलीच्या काकाने फोन करून नितीन शिंदला पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. ते म्हणाले की आम्ही आम्ही देशमुख तुम्ही पाटील औकात आहे का ? अशी धमकी दिली. तसेच त्याला मारायला माणसे घेऊन येतो अशा गर्भीत इशारा दिल्याने नितीन शिंदे या तरुणावर दडपण आल्याने त्याने आत्महत्या केली, अशी तक्रार नितीन शिंदे याच्या वडिलांनी लिबंगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, नितीन शिंदे आणि मुलीच्या काकाची एक ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तसेच नितीन शिंदे याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या प्रेयसीला एक भावनिक टेक्स मॅसेज पाठवला होता. अखेर २० तारखेला नितीन याने घरात गळफास घेऊन स्वत:ला संपवले.
काय आहे टेक्स्ट मॅसेज ?
“मला माफ कर मी तुला साथ नाही देऊ शकत,
तू चांगल्या घरी जातेस, मोठ्या घरची पोरगी मोठ्या घरी जाते,
या नंबरवर परत फोन करू नको, मी नसणार आहे,
पुढच्या जन्मी नक्की देशमुख होऊन येतो,
माझी आसू आय लव यू सांभाळ सगळं,बाय….
असा मॅसेज नितीन शिंदे याने या तरुणीला केला आणि जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत आहे. चार वर्षापासून त्याचं प्रकरण होतं, त्याला दोनदा मारला म्हणून आम्ही समजून सांगितलं होतं.त्यांनी मारला धमक्या दिला, मंगळवारी संध्याकाळी त्यांनी मारलं होतं, त्यामध्ये आमच्या ( सुगावा ) गावातले काही होते, त्यांच्या ( थुगांव ) गावचे सुद्धा होते. त्यांनी दुपारी नितीनला फोन केला. आम्ही पाच 50 माणसे घेऊन येत आहोत तुला चिरतो…तू पाटील आहे आम्ही, आम्ही देशमुख आहोत तुही औकात आहे का आमच्या सोबत लग्न करायची. सकाळी पोरांनं फाशी घेतली, टेन्शन पायी पोरगं गेलं, सातआठ जणांनी त्याचा घास घेतला असे डोळ्यात आसंव आणत नितीनचे वडील प्रभू शिंदे यांनी सांगितलं.
तिचा बाप लग्न करायला तयार होता…पण
नितीन मला सांगितलं होतं. तिचा बाप लग्न करायला तयार होता, मात्र दुसऱ्यांनी करू दिल नाही. नितीन तिच्यावर प्रेम होतं. आमच्यावर जेवढं नव्हतं तेवढं होतं, आणि त्या पोरीचं सुद्धा प्रेम होतं. त्यांना फाशी व्हावी किंवा जेल व्हावी, लेकरू गेलं आता. नितीन भीत होता म्हणत होता,माझं काही खरं नाही, माझ्यावर लय तापलेत मला किंवा तिला मारतील काय सांगता येत नाही असा आपला मुलगा काही दिवस बोलत होता असेही नितीनच्या वडिलांनी सांगितले.
आम्ही सोयरीकीला येत आहे असं सांगितलं आणि…
त्या पोरीला मोठ्या घरचे स्थळ आले होते, ती पोरगी म्हणाली मी लग्न करेल तर त्याच्या संगच करणार. माझ्या भावाला विचारलं तुझं घर कुठे आहे ? आम्ही सोयरीकीला येत आहे. मग, मागून म्हटलं तुझी औकात आहे का देशमुख सोबत लग्न करायची? दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या आधीच त्याने कार्यक्रम केला असे नितीनच्या बहिणीने म्हटले आहे.