Satara Youth Death : वाईतील तरुणाचा परखंदीत आढळला मृतदेह, घातपात की अजून काही?
घटनास्थळी वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्यासह पोलीस दाखल झाले. या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून या युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान खानापूरमध्ये तणावाचे वातावरण झालेले आहे.
सातारा : प्रेम प्रकरणातून वाई तालुक्यातील खानापूर येथील तरुणाची परखंदी गावात हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभिषेक जाधव असे हत्या करण्यात आलेल्या 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाई पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. परखंदीच्या शिवारात अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तरुणाच्या हत्येची माहिती मिळताच खानापूर गावात शोककळा पसरली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा अंदाज
घटनास्थळी वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्यासह पोलीस दाखल झाले. या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून या युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान खानापूरमध्ये तणावाचे वातावरण झालेले आहे.
परखंडी गावात आढळला मृतदेह
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी परखंडी गावातील काही नागरिक शेताकडे जात असताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब लगेच वाई पोलिसांना सांगितली.
वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार, डीबी पथकाचे विजय शिर्के, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर यांच्यासह सर्व टीम घटनास्थळी पोहोचली.
मृतदेहाजवळील कागदपत्रांवरुन तरुणाची ओळख पटवली
पोलिसांनी मृतदेहाबाबत चौकशी केली असता आणि काही मृतदेहाच्या जवळील कागदपत्रावरून युवक खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचे समोर आले. मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी सातारा येथे नेण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, युवकाचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अद्यापही या खून प्रकरणातील संशयतांची नावे निष्पन्न झालेली नाहीत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर हे ही गावात दाखल झाल्याचे समजते.