चेकिंग दरम्यान गाडी थांबवायला सांगणाऱ्या पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन वर्ष आरोपी चकवा देत होता, पण…
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न चांगलाच अंगलट आला आहे. पोलिसांना चकमा देऊन आरोपी सतत फरार होत होता.
कल्याण : चेकिंग दरम्यान पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. दोन वर्ष आरोपी पोलिसांना चकमा देत होता. पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सूरज खैरीराम कायरिया उर्फ बारक्या असे या आरोपीचे नाव असून तो अवैध वाहतूक प्रकरणातही वाँटेड आरोपी आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत गोविंदवाडी परिसरातून कल्याण बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
काय आहे प्रकरण?
साधारण दोन वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेकडे गोविंदवाडी एपीएमसी परिसरात पोलिसांची चेकिंग सुरु होती. यावेळी आरोपीची गाडी येताना दिसताच अवैध वाहतूक करत असल्याचा पोलिसांना संशय आला. यामुळे पोलिसांनी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र चालकाने पोलिसांना न जुमानता गाडीचा वेग वाढवत पोलिसांच्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने प्रसंगावधान राखल्याने पोलीस लगेच बाजूला झाल्याने ते बचावले. यानंतर आरोपी पळून गेला.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला
याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेली दोन वर्षे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत होते. मात्र तो हाती लागत नव्हता. पण गोविंदवाडी परिसरात आरोपी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोलप यांनी पोलीस पथकासह परिसरात सापळा रचला.
आरोपी परिसरात येताच त्याची ओळख पटवत तात्काळ पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस तपासात आरोपी अवैध वाहतूक प्रकरणातही वाँटेड असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.