अंधाराचा फायदा घेत घरात घुसायचा अन् मौल्यवान वस्तू चोरुन पळायचा, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती. यामुळे पोलिसांनी आरोपीविरोधात कंबर कसत वेगाने तपास सुरु केला. अखेर या तपासाला यश आले.
नागपूर : अंधाराचा फायदा घेत घरात घुसून मौल्यवान वस्तू घेऊन फरार होणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. अंधारात तो एकटाच निघायचा आणि सुमसान परिसरात असलेली घरे हेरायचा. मग घरात घुसून चोरी करायचा आणि निघून जायचा. वाथोडा परिसरात त्याने चार मोठ्या घरफोडी केल्या होत्या. तर भंडारा जिल्ह्यातून चार मोटारसायकल चोरी केल्या होत्या. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली आणि कुख्यात आरोपीला अटक केली. आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि चार बाईक जप्त केल्या आहेत. चोरट्याने आणखी किती ठिकाणी चोरी केली, याचा पोलीस तपास करत आहेत.
काळोखात निघायचा अन् बंद घर फोडायचा
रात्र होताच काळोखात तो एकटाच आपल्या मिशनवर निघायचा. विरळ वस्तीचा भाग पाहायचा आणि एका बाजूला असलेल्या घराचं कुलूप तोडून आत प्रवेश करायचा. यात त्याला कोणाच्या मदतीची गरज लागायची नाही. चोरी करून झाली की, आपल्या भाड्याच्या खोलीत येऊन आराम करायचा. वाथोडा पोलीस स्टेशन हद्दीत त्याने अशाच प्रकारे चार घरं फोडली आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी कॅश सुद्धा लुटली. काही दिवस इकडे राहिला की, तो भंडारा जिल्ह्यात जाऊन तिकडे बाईक चोरी करायचा आणि त्या नागपुरात घेऊन यायचा.
आरोपीकडून आठ गुन्ह्यांची कबुली
मात्र अखेर त्याच्या पापाचा घडा भरला अन् तो पोलिसांच्या हाती लागला. त्याने आतापर्यंत आठ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह चार मोटारसायकल जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत. तो हे सगळं कृत्य एकटाच करत होता आणि याच कामासाठी तो मध्य प्रदेशमधून येऊन नागपुरात स्थायिक झाला होता. मात्र आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.