Mumbai Crime : ज्याच्या भीतीने वर्क फ्रॉम होम सुरू, त्याला जामीन मिळाल्याने ती बिथरली; काय आहे नेमका प्रकार ?
पीडितेची ज्याने छेड काढली, तोच आरोपी जामीनावर सुटून बाहेर आला आणि त्याने थेट पीडितेचे घर गाठले आणि तिला ....
मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : मुंबईतील लोकलमध्ये छेडछाडीचा (molestation case) भयानक अनुभव आल्यानंतर आणि पोलिसांकडूनही असंवेदनशील वागणूक मिळाल्यामुळे घाबरलेली तरूणी आत्ता कुठे नीट श्वास घेऊ लागली होती. मात्र या संपूर्ण घटनेला एक वर्षही उलटत नाही तोच ज्याच्यावर छेडछाडीचा आरोप लावला होता, तोच आरोपी घराच्या दारात आल्याने पीडितेची भीतीने गाळण उडाली. पीडितेचा पत्ता कसा मिळाला ? हे विचारण्यात आल्यानंतर, पोलिसांनीच तो (पत्ता) दिला असा दावा आरोपी कामगाराने केला. पीडितेने तिची तक्रार मागे घ्यावी, अशी मागणीही आरोपीने तिच्याकडे केल्याचे समजते.
आम्ही पत्ता दिलाच नाही, अधिकाऱ्यांनी केले हात वर !
पीडितेचा पत्ता आरोपीला देण्याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, असे सांगत याप्रकरणी जीआरपींनी सरळ हात वर केले.त्याला देण्यात आलेल्या चार्जशीटच्या (chargesheet) कॉपीद्वारेच त्याने पत्ता मिळवला असेल, असे ते म्हणाले.
दरम्यान आरोपी घरापर्यंत पोहोचल्याने पीडित तरूणी अतिशय घाबरली असून तिने घराबाहेर पाऊल टाकणंही बंद केलं आहे. स्वत: आणि आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेची काळजी तिला सतावत असून, त्यापायी तिने ऑफीसला न जाता वर्क फ्रॉम होमचा (work from home) पर्यायही निवडला आहे, इतकी ती घाबरली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, छेडछाडीची ही घटना 21 सप्टेंबर 2022 घडल्याचे समोर आले. पीडित तरूणी कामानिमित्त मुंबई लोकलच्या महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत होती. त्याचवेळी अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन करत चुकीचा स्पर्श केला. पीडितेने अंधेरी येथील जीआरपी स्टेशन गाठून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता तिथे तिला असंवेदनशील वागणूक मिळाली. तू त्याला (आरोपी) मारलं का नाहीस असा सवाल एका अधिकाऱ्याने केला. तर आरोपी तिचा बॉयफ्रेंड आहे का ? असा संतापजनक प्रश्न एका महिला अधिकाऱ्याने पीडितेला विचारला. त्यामुळे ती अतिशय दुखावली गेली.
सोशल मीडियावर पोल्ट केल्यावर अधिकाऱ्यांना आली जाग
या असंवेदनशील वागणुकीमुळे पीडितीने तिची आपबीती सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘ माझ्यासोबत जे (छेडछाड) झालं ते किती गंभीर आहे हे त्यांना (अधिकाऱ्यांना) समजू शकलं नाही. ते त्याकडे एखाद्या छोट्या-मोठ्या गुन्ह्याप्रमाणेच पाहत होते’ असे सांगत पीडितेने एक्स (तेव्हाचे ट्विटर) वर या संदर्भात पोस्ट लिहीली असता अखेर अधिकाऱ्यांना जाग आली. आणि त्यांनी या प्रकरणाची दखल घेत तातडीने पाऊल उचलत तीन दिवसांच्या आता आरोपीला अटक केली.