मूल नाही म्हणून मुलगी दत्तक घेतली, मग चिमुकलीसोबत जे केले त्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही !
दोघेही पती-पत्नी डॉक्टर. पण दाम्पत्याला मूल नव्हते. यामुळे त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. पण निःसंतान असलेल्या दाम्पत्याने मुलीला प्रेम देण्याऐवजी तिच्यासोबत जे केले ते पाहून अंगावर काटा येईल.
गुवाहाटी : डॉक्टरला देव म्हटले जाते. मात्र आजच्या कलियुगामध्ये दुर्दैवाने काही डॉक्टर हे देवाऐवजी राक्षस बनले आहेत. गुवाहाटीमध्ये उघडकीस आलेल्या घटनेतून या कटू सत्याची प्रचिती आली आहे. विशेष म्हणजे नवरा-बायको हे दोघेही डॉक्टर असून त्यांनी दत्तक घेतलेल्या लहान मुलीसोबत वारंवार अत्यंत निर्दयी आणि क्रूर कृत्य केले. डॉक्टर दांपत्याने मुलीच्या गुप्तांगाला सिगारेटने चटके दिले, तसेच तिचे दोन्ही हात बांधून छतावर भर उन्हामध्ये उभे केले. निःसंतान दांपत्य ही समाजातील ओळख बदलण्यासाठी मुलगी दत्तक घेतली खरी, मात्र तिला प्रेम देण्याऐवजी तिचा विविध प्रकारे शारीरिक छळ केला. मुलीच्या गंभीर छळवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात डॉक्टर दांपत्याविरुद्ध तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे. वलीउल इस्लाम आणि संगीता दत्ता अशी आरोपी डॉक्टर पती-पत्नीची नावे आहेत.
डॉक्टर पती अटकेत; पत्नी फरार
मुलीच्या छळवणुकीप्रकरणी आसाम पोलिसांनी बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत डॉक्टर दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य विचारात घेत पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मात्र पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच डॉक्टरची पत्नी संगीता दत्ता हिने अन्यत्र पळ काढला आहे. आरोपी वलीउल इस्लाम याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संगीता हिला फरार होण्याकामी मदत करणाऱ्या मोलकरणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वलीउल हा मनसोपचार तज्ज्ञ आहे. त्याने आणि पत्नी संगीता या दोघांनी पीडित मुलीला घराच्या छतावर भर उन्हामध्ये हात बांधून उभे करून ठेवले होते. डॉक्टर दांपत्य दत्तक घेतलेल्या मुलीचा नियमित छळ करत होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. मुलीच्या छळवणुकीप्रकरणी शेजारील व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉक्टर दांपत्याच्या घरावर छापा टाकून कारवाई केली.
मुलीच्या अंगावर गंभीर दुखापती
डॉक्टर दांपत्याने केलेली मारहाण तसेच सिगारेटने दिलेले चटके यामुळे अल्पवयीन मुलीच्या अंगावर गंभीर दुखापती झाल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. डॉक्टर दांपत्याने अल्पवयीन मुलीला रोमा एनक्लेव्ह नावाच्या इमारतीतील चौथ्या मजल्यावर एका खोलीमध्ये बंद करून ठेवले होते. याचदरम्यान मुलीच्या अंगावर सिगारेटचे चटके देण्यात आले.
वैद्यकीय तपासणी दरम्यान मुलीच्या गुप्तांगालाही सिगारेटचे चटके दिल्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत आढळली. डॉक्टर दांपत्याविरुद्ध पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे या प्रकरणात आसामचे मुख्यमंत्री हेमंत सरमा आणि डीजीपी जी. पी. सिंह हेदेखील गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत.