सासूने दिलेले 44 लाख चोरट्यांनी लुटले; चोरीचा तपास करताना जे समोर आले ते ऐकून पोलीसही चक्रावले !
व्होराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले. पोलिसांनी व्होराची चौकशी केली असता त्यांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले.
मुंबई : अंधेरी येथील एका रहिवाशाची 44 लाखांची रोकड चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस तपासात जे समोर आले ते ऐकून पोलीसही चक्रावले. फिर्यादीनेच पत्नीला धडा शिकवण्यासाठी लुटीचा बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी फिर्यादीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अमीर व्होरा असे अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. आरोपीची पोलसी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. व्होरा याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 406 (शांततेचा भंग) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
सासूने दिलेले 44 लाख लुटल्याचा केला बनाव
अमीरच्या सासूने फ्लॅट खरेदी करण्यासाठी 44 लाख रुपये पाठवले होते. हे पैसे घेण्यासाठी तो वडिलांसोबत 22 फेब्रुवारी रोजी भुलेश्वरला गेला होता. यानंतर रात्री 11.30 वाजता अमीर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गेला. आपल्याकडील 44 लाखांची रक्कम दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी लुटल्याचा बनाव पोलिसांकडे गेला.
परतीच्या वाटेवर असताना भायखळा येथे आपल्या कारच्या दोन्ही बाजूला दोन दुचाकीस्वार आले. कार थांबवताच एका व्यक्तीने त्याचा परवाना मागितला आणि तो बाहेर काढत असताना त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या दुचाकीस्वारांनी रोख रक्कम असलेली बॅग उचलून पोबारा केला, असे त्याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला
व्होराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले. पोलिसांनी व्होराची चौकशी केली असता त्यांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. त्याने सांगितले की, ही घटना संध्याकाळी 7.30 वाजता घडली होती. परंतु घटनेच्या चार तासांनंतर तो पोलीस ठाण्यात आला, असे आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी व्होराच्या वडिलांना फोन केल्यानंतर घटना उघड
जेव्हा त्याला घटनेच्या ठिकाणाबद्दल विचारले तेव्हा तो पोलिसांना अचूक ठिकाण सांगू शकला नाही. दरम्यान, पोलिसांनी अनपेक्षितपणे व्होराच्या वडिलांना फोन केला. यावेळी व्होराच्या वडिलांनी सांगितले की असे काही घडलेच नाही. यानंतर पोलिसांनी पुन्हा व्होराची चौकशी केली असता त्याने पोलिसांकडे चोरीचे गुपित उघड केले.
अमीर व्होरा हा विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. व्होरा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो. पत्नीच्या सतत खर्च करण्याच्या सवयीबद्दल तो त्रस्त होता. पत्नी त्याच्या मेहनतीच्या पैशाला कधी महत्व देत नव्हती. सतत आपल्या आईच्या पैशांचा मोठेपणा दाखवत त्याला कमीपणा दाखवायची. हल्ली त्यांच्यात दैनंदिन खर्चावरुन वाद झाला होता.
पत्नीला अद्दल घडवण्यासाठी केला बनाव
यानंतर पत्नीला अद्दल घडवण्यासाठी त्याने सासूने दिलेली रक्कम आपल्या मालाड येथील घरी नेऊन ठेवली. मग पोलीस ठाण्यात जाऊन लुटीचा बनाव रचला. पण पोलिसांनी व्होराच्या वडिलांना कॉल केला आणि सर्व बनाव उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी व्होराविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.