अचानक फोन आला म्हणून गाडी उभी केली, पण त्यांना काय तो त्यांचा शेवटचा कॉल ठरेल, प्राध्यापकासोबत काय घडलं?
सेवानिवृत्त प्राध्यापक आपले काम आटोपून घराकडे चालले होते. इतक्यात त्यांना फोन आला अन् ते थांबले. आरोपीने नेमकी हीच संधी साधली.
अकोला : राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे पालकत्व असलेल्या अकोला शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रा. रणजित इंगळे असे मयताचे नाव असून, ते दिव्यांग आहे. इंगळे यांनी दिव्यांग बांधवांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या हत्येमागचे कारण नेमके काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. इंगळे यांच्या हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इंगळे यांची हत्या कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
अचानक कॉल आला म्हणून मोटारसायकल उभी करुन बोलत होते
जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गंगानगर परिसरात राहणारे प्रा.रणजीत इंगळे हे रात्रीच्या सुमारास घराकडे चालले होते. यादरम्यान त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. इंगळे यांनी मोटारसायकल उभी केली आणि ते मोबाईलवर बोलत होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने मागून येवून इंगळे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा वार केला. वार जोरदार असल्याने डोक्यातून रक्तस्राव होवून इंगळे रस्त्यावर कोसळले.
हत्या करुन रस्त्याच्या कडेला टाकले
यानंतर मारेकऱ्याने जखमी इंगळे यांना ओढून उभ्या असलेल्या एका ट्रकच्या बाजूला नेवून टाकले आणि घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता एका कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड झाल्याचे दिसून आले. तर पोलिसांनी या कॅमेऱ्यातील फुटेज ताब्यात घेतले असून, मारेकरी एकटा असल्याचे दिसून येत आहे. इंगळे यांच्या जवळील पैसे आणि वस्तू तशाच असल्याने लुटण्याच्या उद्देशाने ही घटना घडली नसल्याचे स्पष्ट होते. प्रा.रणजित इंगळे यांची हत्या नेमकी कशासाठी केली, याचा तपास जुने शहर पोलीस करत आहेत.