Amaravati Crime : पैशांचा पाऊस पाडतो सांगत पैसे घेतले, पण पैशांचा पाऊस पडलाच नाही, मग…
अंधश्रद्धा आणि जादूटोणा यामुळेही गुन्हेगारी वाढत चालली आहे. यातून हत्येसारख्या भयंकर घटना घडत आहेत. अशीच एक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे.
अमरावती / 17 ऑगस्ट 2023 : जादूटोणाच्या प्रकरणातून एका मांत्रिकाची हत्या केल्याची घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. पैसे घेऊनही मांत्रिकाने पैशांचा पाऊस न पाडल्याने संतापलेल्या पाच जणांनी त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पाच जणांना नागपुरातून अटक केली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील शिवनी शिवारात ही घटना घडली. या घटनेमुळे शिवनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जादूटोणा, अंधश्रद्धेविरोधात कितीही कडक कायदे केले, कितीही जनजागृती केली तरी कमी होण्याचे नावच घेताना दिसत नाही.
काय आहे प्रकरण?
मयत मांत्रिकाने आरोपींना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी मांत्रिकाने आरोपींकडून काही पैसे घेतले होते. मात्र पैसे घेऊनही मांत्रिकाने पैशांचा पाऊस पाडला नाही. आरोपी याबाबत वारंवार त्याच्याकडे विचारणा करत होते. मात्र तो टाळाटाळ करत होता. यामुळे आरोपी आणि मयत मांत्रिक यांच्यात वाद झाला. याच वादातून आरोपींनी फावड्याच्या दांडक्याने आणि काठीने मांत्रिकाच्या डोक्यावर वार करत त्याची हत्या केली. शिवनी शेतशिवारात एक झोपडीत ही हत्याकांडाची घटना घडली.
आरोपींच्या नागपुरमधून मुसक्या आवळल्या
मांत्रिकाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मांत्रिकाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना जादूटोणाबाबत माहिती मिळाली मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपासचक्रे फिरवत पाच आरोपींना नागपुरवरुन अटक केली आहे.