चोरी टाळण्यासाठी बाथरुमच्या खिडकीला वीजप्रवाह सोडला, मग नंतर जे घडले भयंकर !
चोरी रोखण्यासाठी दुकानदार महिलेने खिडकीच्या लोखंडी ग्रीलला लावलेल्या इलेक्ट्रिक शॉकमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे.
नालासोपारा / विजय गायकवाड : नालासोपारा पूर्व विभागातील चाळी आणि दाटीवाटीच्या परिसरात असणाऱ्या घराच्या बाथरूमच्या खिडक्या तोडून चोरटे चोऱ्या करतानाच्या घटना घडत आहे. अशीच चोरी टाळण्यासाठी एका दुकानदार महिलेने आपल्या बाथरूमच्या लोखंडी ग्रीलमध्ये विजेचा प्रवाह सोडला होता. त्याच विजेच्या प्रवाहाला चिटकून एका 18 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना नालासोपाऱ्यात उघड झाली आहे. याबाबत दुकानदार महिलेच्या विरोधात भादवी कलम 304 प्रमाणे तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
राकेश नरेंद्र शिंदे असे मयत झालेल्या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. हा तरुण नालासोपारा मोरगाव नगीनदास पाडा येथील राहणारा आहे. तर मीरा संजय कांदु असे गुन्हा दाखल झालेल्या 42 वर्षीय दुकानदार महिलेचे नाव आहे. नालासोपारा पूर्व मोरगाव तलावाजवळील राजाराम आपर्टमेंटमध्ये राहते. याच इमारतीच्या तळ मजल्यावर या महिलेचे किराणा दुकान आहे.
या दुकानाच्या पाठीमागील खिडकीतून चोर दुकानात येऊन चोरी करू नये यासाठी दुकानातील बाथरूममध्ये असलेल्या इलेक्ट्रिक सॉकेटमधून दुकानाच्या मागे बाथरूमच्या खिडकीच्या खाली ठेवलेल्या लोखंडी ग्रीलला इलेक्ट्रिक करंट दिला होता. याच करंटला चिटकून तरुणाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र प्रकरणाचा तपास करत असताना ही धक्कादायक घटना उघड झाली.
याप्रकरणी दुकानदार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर महिलेला नोटिस बजावण्यात आली असून, तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.