होळीपूर्वी हेरॉईन आणि एमडी ड्रग जप्त, मालवणी पोलिसांनी धडक कारवाई
मालाडमधील मालवणी परिसरात कारवाई करत पोलिसांनी 52 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे. याप्रकरणी मालवणी गावात राहणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई / गोविंद ठाकूर : मालवणी परिसरात पोलिसांनी कारवाई करत 52 लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे. मालवणी पोलिसांनी धडक कारवाई करत होळीपूर्वी 52,15,000 रुपयांचे हेरॉईन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी एका आरोपीला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. लालमोहम्मद हबीब शेख असे अटक करण्यात आलेल्या 48 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपी मालवणी गावातील रहिवासी आहे. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला
मालवणी परिसरात एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मालवणी परिसरात सापळा रचला. यावेळी एक संशयित इसम तेथे दिसला असता पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याची चौकशी सुरु केली.
आरोपीकडून 52 लाखांचे ड्रग्ज जप्त
आरोपीची चौकशी केली असता त्याच्याकडे 130 ग्रॅम हेरॉईन आणि 3 ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. या ड्रग्जची किंमत 52,15,000 रुपये आहे. पोलिसांनी ड्रग्जसह सदर आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.