दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या अन् दागिने चोरत होत्या, दुकानदाराच्या सतर्कमुळे प्रयत्न फसला !
दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिला दुकानात आल्या. त्यांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवत दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला.
कल्याण / सुनील जाधव : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी दुकानील दागिने चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. दुकानदाराच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्याने नागरिकांच्या मदतीने महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कोळसेवाडी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी करत आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिलेची दुसरी साथीदार महिला पळून जाण्यात यशस्वी झाली असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.
महात्मा फुले परिसरात घडली घटना
कल्याण महात्मा फुले नगर परिसरात चामुंडा ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात दोन महिला सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. या महिलांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवत, दुकानात चोरी केली. दुकानातून पळ काढत होत्या. इतक्यात दुकानदाराच्या ही बाब लक्षात आली. दुकानदार त्या महिलांच्या पाठी आरडाओरड धावला. दुकानदाराचा आरडाओरडा ऐकून दोन नागरिक त्याच्या मदतीला धावले.
कोळसेवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरु
दुकानदाराने नागरिकांच्या मदतीने एका महिलेला पकडले. याप्रकरणी संबंधित दुकान चालकांनी या संपूर्ण घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना देत त्या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या कोळसेवाडी पोलिसांनी या संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे. ही महिला चोर आहे की नाही आणि दुकानातून पळ काढणारी महिला नेमकी कोण होती याची चौकशी पोलीस करत आहेत.