सिनेमा दाखवला, दागिने खरेदी करुन दिले; मग कालव्यात ढकलले, बापाने स्वतःच्याच मुलीसोबत का केले असे?
आधी 31 ऑक्टोबर रोजी मुलीला चित्रपट पहायला घेऊन गेले. चित्रपट पाहिल्यानंतर शॉपिंगला नेले. त्यानंतर ज्वेलरी दुकानात जाऊन दागिने खरेदी केले.
बेल्लारी : मुलीचे दुसऱ्या समाजातील मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे नाराज झालेल्या पित्याने कालव्यात ढकलून मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. ओमकार गौडा असे आरोपी पित्याचे नाव आहे. कर्नाटकातील बेल्लारी येथील कुडाठिणी शहरात ही घटना घडली आहे.
ओमकार गौडा यांच्या मुलीचे दुसऱ्या समाजातील मुलासोबत प्रेमसंबंध सुरु होते. याची माहिती मिळताच ओमकार यांनी आपल्या मुलीला हे प्रेमसंबंध तोडण्यासाठी समजावले होते. मात्र मुलगी ऐकायला तयार नव्हती. यामुळे ओमकार याचा संताप झाला होता.
मुलीच्या हत्येचा कट रचला
संतापलेल्या ओमकार याने मुलीच्या हत्येचा कट रचला. यासाठी ते आधी 31 ऑक्टोबर रोजी मुलीला चित्रपट पहायला घेऊन गेले. चित्रपट पाहिल्यानंतर शॉपिंगला नेले. त्यानंतर ज्वेलरी दुकानात जाऊन दागिने खरेदी केले.
सर्व शॉपिंग आटोपल्यानंतर दोघे घरी परतत होते. घरी परतत असताना ओमकारने वाटेत एचएलसी कॅनॉलजवळ कार थांबवली आणि मुलीला गाडीतून बाहेर यायला सांगितले. वडिलांच्या हेतूपासून मुलगी अनभिज्ञ होती.
घरी परतताना आरोपी मुलीला कालव्यात ढकलले
मुलगीही काहीही विचार न करता गाडीतून खाली उतरली. त्यानंतर निर्दयी बापाने तिला मागून धक्का देत कालव्यात ढकलले. कालव्यात बुडून मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर बाप घरी न जाता तिरुपतीला पळून गेला.
आईने बाप-लेक बेपत्ता झाल्याची तक्रार दिली
वडील आणि मुलगी घरी न आल्याने मुलीच्या आई आणि भावाने दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाप घरी परतल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी केली.
पोलीस चौकशी होताच आरोपी भांबावला आणि मुलीच्या हत्येची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मुलीच्या मृतदेहाचा कालव्यात शोध घेण्यात येत आहे.