एसटी रेस का करतो म्हणत चालकाला मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद, काय आहे प्रकरण?
हल्ली एसटी बस चालकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. क्षुल्लक कारणावरुन ऑनड्युटी एसटी वाहक, चालकांना मारहाणीच्या घटना घडत आहेत.
खेड, पुणे : पुण्याच्या खेड तालुक्यातील कडुस गावात एसटी बस चालकाला तरुणांकडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. साबुर्डीवरुन राजगुरुनगरकडे एसटी बस येत असताना दुचाकीस्वार तरुणांकडून बस चालकाला मारहाण करण्यात आली. एसटी बस चालकाला मारहाण करताना प्रवासी महिलाही जखमी झाली आहे. भररस्त्यात घडलेला हा राडा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बस चालक आणि प्रवासी महिलेकडून खेड पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करुन शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींवर खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय. राजेंद्र प्रभाकर कांबळे असे पीडित चालकाचे नाव आहे.
साबुर्डीवरुन राजगुरुनगरला चालली होती बस
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर आगाराची एसटी बस ही साबुर्डीवरून राजगुरुनगर येत होती. साबुर्डी ते राजगुरुनगर दरम्यान असलेल्या कडुस गावामध्ये प्रवासी उतरवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र समोर थांबली होती. यावेळी एसटी बसच्या समोर एक दुचाकीस्वार उभा होता.
एसटी चालकाने रेस केली म्हणून मारहाण
एसटी बस बंद पडू नये म्हणून चालकाने एक्सीलेटर दाबून साधारण रेस केली. यावरुन मोटारसायकलवरील दोघांनी चालकाला ‘तू एसटी बस का रेस करतो, तुला दम नाही का, तुला लय माज आला आहे का?’, असे म्हणत चालकाला खाली ओढू लागला. परंतु चालक खाली उतरला नाही. नंतर त्या व्यक्तीने तुला मारून टाकीन, तुला खल्लास करून टाकीन, आमचे कडुसमध्ये कोणी वाकडे करू शकत नाही, असे म्हणून शिवीगाळ करू लागला.
यावेळी चालक राजेंद्र कांबळे यांनी मोबाईल फोन चालू करून त्या व्यक्तीचे मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण घेऊ लागले. यावेळी आणखी एक जण आला आणि बसचा ड्रायव्हर बाजूचा दरवाजा उघडून चालका बरोबर झटापट करू लागला. हातातील उसाचे टिपऱ्याने एसटी बसचे समोरील काचेवर,साईड ग्लास आरशावर मारून तेच उसाचे टिपरे चालकाच्या उजव्या पायावर आणि उजव्या हातावर मारले. यावेळी चालक एसटीतून न उतरल्याने आरोपींनी झटापट केली.
आरोपींचे पलायन
या झटापटील चालकाच्या शासकीय युनिफॅार्मची तीन नंबरची गुडी तुटली. तसेच चालकाला जखमही झाली. यावेळी एसटी बसचा ड्रायव्हर बाजूचा दरवाजा जोरात ढकलला असता तो प्रवासी महिलेच्या डोक्यास लागून त्यांना जखम झाली. ते पाहून आरोपींनी तिथून पळ काढला. यानंतर चालकाने बस खेड पोलीस स्टेशनमध्ये आणून तक्रार दाखल केली आहे.