Pune crime : चंदनचोर गजाआड, एफटीआयआयच्या आवारातून केली होती चोरी; 95 किलो चंदनाची झाडं जप्त
चंदनाचे झाड कापण्यासाठी वापरली जाणारी कुऱ्हाडे, वाकस, रिकामी पोती असा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला. आरोपींकडून दहा किलो चंदनाचे लाकूड यावेळी जप्त करण्यात आले.
पुणे : एफटीआयआयच्या आवारात (FTII premises) चंदन चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. एकूण चंदन चोरीचे पाच गुन्हे उघड उघड झाले असून 95 किलो चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली आहेत. आठवड्यापूर्वी चोरट्यांनी एफटीआयआयच्या आवारातून चंदनाची झाडे (Sandalwood trees) चोरली होती. लहू तानाजी जाधव (वय 32), हनुमंत रमेश जाधव (वय 30), महादेव तानाजी जाधव (वय 30, तिघे रा. चौफुला चौक, धायगुडे वाडी, ता. दौंड, जि. पुणे), रामदास शहाजी माने (वय 28, रा. मोडवे, खोमणे वस्ती, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चंदन चोरी करणाऱ्या चोरट्यांना सापळा रचून अटक (Arrested) करण्यात आली. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कारवाई केली.
चोरली होती तीन झाडे
या प्रकरणी अशोक मच्छिंद्र तांदळे (वय 30, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रस्ता) याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मागील आठवड्यात एफटीआयआयच्या आवारातून तीन चंदनाची झाडे चोरून चोरटे पसार झाले होते. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत होता. येथून चोरलेल्या चंदनाच्या झाडाचे खोड अशोक तांदळेला विकण्यात आले होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तांदळेच्या घरी जात तपास केला होता.
सिंहगड रस्ता परिसरात सापळा
पोलीस आले तेव्हा तांदळे घरात नसल्याचे आढळून आले. तांदळेच्या पत्नीकडे अधिक चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याच्या घरातून 85 किलो चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली. चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरांची टोळी सिंहगड रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आरोपींना सापळा रचून पकडण्यात आले.
मुद्देमाल जप्त
चंदनाचे झाड कापण्यासाठी वापरली जाणारी कुऱ्हाडे, वाकस, रिकामी पोती असा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला. आरोपींकडून दहा किलो चंदनाचे लाकूड यावेळी जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, गुंगा जगताप, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार आदींनी ही कारवाई केली.