लेकाच्या स्वागतासाठी मन्नतवर रोषणाई, पण एक चूक नडली, आर्यनची आजची रात्रही तुरुंगातच
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला असला तरी त्याला आज जामीन मिळणार नाहीय. कारण जामीनासाठी लागणारे कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते शक्य झालं नाही.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला असला तरी त्याला आज जामीन मिळणार नाहीय. कारण जामीनासाठी लागणारे कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते शक्य झालं नाही. विशेष म्हणजे आज आर्यनची जेलमधून सुटका होईल, अशी चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर शाहरुख खानचं निवासस्थान असलेल्या मन्नत बंगल्यावर रोषणाई करण्यात आलीय. पण आर्यनची आज जेलमधून सुटका होऊ शकलेली नाही. पण उद्या सकाळी त्याची सुटका होण्याची शक्यता आहे.
आर्यनची आज सुटका का नाही?
ऑर्थर रोड जेल प्रशासनाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आर्यनला आजची देखील रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे. आर्यन खान आज ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडणार नाही. कुणासाठीही नियम बदलणार नाही. जामीनासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रपेटी आम्ही उघडलेली होती. पण तिथे आर्यनच्या जामीना संबंधित कोणतेही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे आर्यनची आज जेलमधून सुटका होणार नाही, अशी माहिती ऑर्थर रोड जेलकडून देण्यात आली आहे. तसेच आर्यनची उद्या सकाळी जेलमधून सुटका होईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
Mumbai | Aryan Khan will not be released from the jail today. He will be released tomorrow morning: Arthur Road Jail officials
— ANI (@ANI) October 29, 2021
आर्यनसाठी मातब्बर वकिलांची फौज, मुकूल रोहतगी यांच्या मुद्देसूद युक्तीवादानंतर आर्यनला जामीन
एनसीबीने केलेल्या क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील कारवाईत आर्यन खान अडचणीत आला होता. त्याच्या जामीनासाठी शाहरुख खानने मातब्बर वकिलांची फौज कामाला लावली होती. पण एनसीबीच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादांपुढे हे वकील काहीसे कमी पडताना दिसत होते. अखेर तीन दिवसांपूर्वी हायकोर्टात ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत कोर्टात आर्यनची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी दाखल झाले. त्यांनी सलग दोन दिवस आर्यनच्या बाजूने युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांचा दाखला दिला. तसेच त्यांनी विविध कलमांचा दाखल दिला. त्यांनी केलेल्या युक्तीवादानंतर अखेर गुरुवारी (29 ऑक्टोबर) हायकोर्टातून आर्यनला जामीन मंजूर झाला. पण जामीन मंजूर झाल्यानंतर त्याची लगेच कोर्टातून सुटका होणार नाही. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
जुही चावला आर्यनच्या जामीनदार
आर्यनला काल जामीन मिळाल्यानंतर आज त्याला कोर्टातून सुटका मिळावी यासाठी अभिनेत्री जुही चावला आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सेशन कोर्टात दाखल झाल्या. त्या आर्यन खानच्या जामीनावर गॅरेंटर म्हणून सही केली. यावेळी कोर्टात सतीश मानेशिंदे देखील दाखल झाले होते. कोर्टात सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली. पण जेलमधून सुटका होण्याबाबतचे देखील काही महत्त्वाचे नियम असतात. आर्यनच्या जामीनाचे सर्व कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ऑर्थर रोड जेलच्या पेटीपत्रात पोहणं आवश्यक होतं. कारण ही पेटी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत उघडते. वकील सतीश मानेशिंदे कोर्टातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पार करुन कागदपत्रे घेऊन कोर्टातून जेलच्या दिशेला निघाले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. त्यामुळे आर्यनला आज जामीन देता येणार नाही, अशी माहिती ऑर्थर रोड जेल प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा : Aryan khan Release Live Update | | आर्यन खानची आज सुटका होणार नाही, आजचा मुक्कामही तुरुंगातच