Baba Siddiqui Death : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, सिद्दीकींचा सुरक्षा रक्षकच निलंबित
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला आज आठवडा उलटला आहे. गेल्या शनिवारी 3 हल्लेखोरांनी वांद्रे येथे सिद्दीकी यांच्यावर भररस्त्यात गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला आज 8 दिवस उलटले आहेत. 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये सिद्दीकी यांच्यावर तिघांनी गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून सिद्दीकी यांची सलमानशी जवळीक असल्यानेच त्यांना टार्गेट करून संपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.याप्रकरणी पोलिसांनी चौघांन अटक केली असून रोज नवनवे खुलासे होत आहेत.
दरम्यान सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. सिद्दीकी यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सिद्दीकी यांच्या सुरक्षा रक्षकाकडून चूक झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळेच कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या शनिवारी रात्री सिद्दीकींच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी सोनावणे हेच सिद्दीकींसोबत होते. फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाल्याचा फायदा घेत मारेकऱ्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला, असा दावा सोनावणे यांनी केला आहे. बाबा सिद्दिकी यांना दिवसा दोन तर रात्री एका कॉन्स्टेबलची सुरक्षा देण्यात आली होती.
बाबा सिद्दीकी यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा कालच पोलिसांनी जबाब नोंदवला. शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला तेव्हा हा कॉन्स्टेबल कुठे उभा होता? फायरिंग झाल्यावर त्याने काय केलं ? तो घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्या सुरक्षारक्षक कॉन्स्टेबलचा जबाब नोंदवून घेतला. मात्र आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
न्याय हवा, सिद्दीकी कुटुंबियांची मागणी
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली. झिशान यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी केली. “ लोकांचं संरक्षण करताना आणि निर्दोष गरीब लोकांची घरं वाचवताना माझ्या वडिलांनी जीव गमावला. आज माझे पूर्ण कुटुंब कोलमडलं आहे. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण व्हायला नको. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. मला न्याय हवाय, माझ्या कुटुंबाला न्याय हवाय”, असं ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केलं होतं.