खासदाराचा पीए असल्याचं सांगून फसवलं, बडेमिया रेस्टॉरंटच्या मालकाला लाखोंचा चुना
मुंबईतील बडेमियाँ रेस्टॉरंट हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. आता त्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू आहे. एका खासदाराचा पीए असल्याचा बनाव करत एका भामट्याने बडेमियाँच्या मालकांची लाखोंची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबईतील बडेमियाँ रेस्टॉरंट हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. आता त्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू आहे. एका खासदाराचा पीए असल्याचा बनाव करत एका भामट्याने बडेमियाँच्या मालकांची लाखोंची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बडेमियाचे मालक जमाल शेख यांची ११ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. मुलीला शासकीय विधी महाविद्यालयात (जीएलसी) प्रवेश देण्याचे आश्वासन देऊन ९ लाख रुपये लुबाडण्यात आले तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेवण द्यायचं आहे सांगून २ लाखांच्या जेवणाची ऑर्डर देण्यात आली. मात्र त्याचे पैसे काही देण्यात आले नाही.
तब्बल ११ लाखांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जमाल शेख यांनी काळाचौकी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सूरज काळव याला अटक करून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे चार गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत
नेमकं काय झालं ?
याप्रकरणी हॉटेल मालक जमाल शेख यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने २ जुलै रोजी त्यांना फोन केला. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा स्वीय सहाय्यक बोलत असल्याचे सांगून त्याने फसवणूक केली. अरविंद सावंत यांचा पीए बोलत असल्याचे सांगून लाखोंची जेवणाची ऑर्डर दिली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जेवण, तसेच बिर्याणी, गुलाब जामुन अशी लाखोंची ऑर्डर आरोपीने दिली होती. मात्र त्याने जेवणाचे पैसे दिले नाहीत.
एवढी मोठी ऑर्डर देऊन सुद्धा पैसे न मिळाल्याने बडे मिया रेस्टॉरंटच्या मालकांने चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली. अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. तसेच बडे मिया रेस्टॉरंटच्या मालकाच्या मुलीला लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन देण्याच्या नावाखाली सुद्धा त्याने पैसे घेतले होते. पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर संबंधित इसम अरविंद सावंत यांचा पीए नसल्याच समोर आलेल आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी संबंधित आरोपीच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.