नाना पाटेकरांच्या ‘मच्छर’ नंतर याच डासाला तुफ्फान प्रसिद्धी, बदलापुरच्या इंस्टा रीलचा सोशल मीडियावर धुमाकूळ
मच्छरचा प्रादुर्भाव वाढल्याने बदलापुरात सर्व नागरिक हैराण झाले आहेत. वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणूनही यावर काही कारवाई होत नाही. यामुळे एका तरुणाने यावर रील बनवली असून, ती सोशल मीडियात तुफान व्हायरल झाली आहे.
बदलापूर / निनाद करमरकर : सोशल मीडियाच्या भूताने प्रत्येकाल झपाटले आहे. रील्स बनवणे आणि सोशल मीडियावर शेअर करणे हा तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि तरुणांपासून वृ्द्धांपर्यंत सर्वांचाच दिनक्रम बनला आहे. तरुण मंडळी कोणत्या गोष्टीवर रील्स बनवतील हे सांगणे कठिण आहे. बदलापूरच्या तरुणाचा असाच एक भन्नाट रील्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. बदलापूर शहरात सध्या डासांचा त्रास वाढला आहे. याकडे स्थानिक प्रशासन लक्ष देत नसल्यानं एका तरुणानं इन्स्टा रीलच्या माध्यमातून या त्रासाला वाचा फोडली आहे. यासाठी चक्क डोक्यात मच्छर अगरबत्ती लावून हा तरुण बदलापूरमध्ये फिरत असल्याचं या रीलमध्ये पाहायला मिळतंय.
बदलापूरमध्ये सध्या मच्छरचं साम्राज्य
बदलापूर शहराच्या पूर्व भागात विशेषतः कात्रप, घोरपडे चौक, शिरगाव, आपटेवाडी या भागात डासांचा त्रास गेल्या काही दिवसात वाढला आहे. मात्र हा त्रास कमी करण्यासाठी नगरपालिकेकडून धूर फवारणी, औषध फवारणी असे कोणतेही उपाय सध्या केले जात नाहीत. त्यामुळे नागरिक मात्र हैराण झाले असून डेंग्यू मलेरियाचे रुग्णही वाढत चालले आहेत. याकडे नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी बदलापूरच्या ऋषिकेश गायकवाड या तरुणाने इन्स्टाग्रामवर रील बनवली आहे.
काय आहे रीलमध्ये?
या रीलमध्ये हा तरुण डोक्यात आणि हातात मच्छर अगरबत्ती लावून परिसरात फिरताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे. हा व्हिडीओ बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आता तरी नगरपालिका डास निर्मूलनासाठी मोहीम हाती घेईल, अशी अपेक्षा आहे.