डॉक्टरची होणाऱ्या पत्नीशी भलतीच मस्करी, संतापलेल्या तरुणीने ‘असा’ काढला राग
पोलिसांनी महिलेसह सुनील आणि गौतम या दोन आरोपींना 16 सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले.
बंगळुरु : बंगळुरुमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. होणाऱ्या पत्नीची भलतीच मस्करी करणे डॉक्टरच्या जीवावर बेतली आहे. रागाच्या भरात तरुणीने आपल्या मित्रांसोबत मिळून 27 वर्षीय डॉक्टरला संपवले. विकासवर 10 सप्टेंबर रोजी हल्ला (Attack) करण्यात आला होता. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान 14 सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू (Death) झाला. मयत डॉक्टर (Doctor) आणि आरोपी सर्व जण बंगळुरुच्या बीटीएम लेआऊट परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र एक आरोपी सूर्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
विकास राजन असे 27 वर्षीय मयत डॉक्टरचे नाव आहे. विकास मूळचा चेन्नईचा असून सध्या बीटीएम लेआऊट परिसरात राहतो. आरोपी तरुणी आणि मयत डॉक्टर गेल्या दोन वर्षापासून रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने त्यांचा साखरपुडाही झाला होता.
काय आहे प्रकरण ?
डॉ. विकासने आपल्या मित्राच्या नावे सोशल मीडियावर फेक अकाऊंट बनवले होते. या अकाऊंटवर त्याने आपल्या होणाऱ्या पत्नीचे न्यूड फोटो शेअर केले. इतकेच नाही त्याने आपल्या मित्रांनाही हे फोटो पाठवले.
तरुणीने 8 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर तिचे फोटो पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. याबाबत तिने विकासला विचारणा केली. यावर विकासने त्याने हे केवळ मनोरंजनासाठी केल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.
प्लाननुसार विकासला मारायचे नव्हते
महिलेने तिचा मित्र सुशीलसोबत मिळून विकासला धडा शिकवण्याचे ठरवले. सुशीलने आपले दोन मित्र गौतम आणि सूर्या यांनाही सोबत घेतले. त्यांच्या प्लाननुसार त्यांना विकासला मारायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी विकासवर मॉप, पाण्याची बाटली आणि हाताने हल्ला केला.
मात्र मारहाणीत विकास बेशुद्ध पडला. त्यांनी तात्काळ त्याला दवाखान्यात नेले. यानंतर तरुणीने विकासच्या भाऊ विजयला फोन करुन याबाबत कळवले.
विकासचे मित्रांसोबत भांडण आणि मारामारी झाल्याचा केला बनाव
विकाससोबत आपण त्याच्या मित्राकडे गेलो होतो. यावेळी आपण बाहेर फोनवर बोलण्यासाठी गेलो असता त्याचे मित्रांसोबत भांडण झाले आणि यात मित्रांनी त्याला मारहाण केली, असे तरुणीने विजयला सांगितले.
पोलीस तपासात तरुणीच्या सांगण्यावरुन हल्ला केल्याचे निष्पन्न
मात्र पोलिसांच्या तपासात तरुणीच्या सांगण्यावरूनच तिच्या मित्रांनी विकासवर हल्ला केल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलेसह सुनील आणि गौतम या दोन आरोपींना 16 सप्टेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
बंगळुरुत एफएमजीईचे कोचिंग क्लासेस चालवायचा विकास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकासने युक्रेनमधून आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर दोन वर्षे चेन्नईत प्रॅक्टिस केली. सध्या गेल्या चार महिन्यांपासून बंगळुरुत आला होता. बंगळुरुमध्ये तो फॉरेन मेडिकल ग्रेजुएट्स एक्झामिनेशन (एफएमजीई)चे कोचिंग क्लासेस घेत होता.